पती म्हणाला, पत्नीच्या सुंदर चेहऱ्यामागे भयानक चेटकीण, हायकोर्टाने फटकारले
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 17, 2023 02:26 PM2023-10-17T14:26:32+5:302023-10-17T14:27:30+5:30
वक्तव्य निरर्थक असल्याचे सुनावले
नागपूर : पती-पत्नीमधील भांडण टोकापर्यंत गेल्यानंतर ते एकमेकांवर खालच्या पातळीपर्यंत जाऊन आरोप करू शकतात, हे एका प्रकरणामुळे दिसून आले. संबंधित प्रकरणातील पतीने पत्नीचे वाईटपण सिद्ध करण्यासाठी तिच्या सुंदर चेहऱ्यामागे भयानक चेटकीण लपली आहे, असे वक्तव्य केले. परिणामी, त्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. कायद्याच्या दृष्टीकोणातून हे अनावश्यक व असंबद्ध वक्तव्य असून त्याला काहीच महत्व नाही, असे न्यायालयाने पतीला सुनावले.
प्रकरणातील दाम्पत्य नागपूरमधील रहिवासी असून कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे ते वेगळे झाले आहेत. २५ जुलै २०२३ रोजी कुटुंब न्यायालयाने पत्नी व तिच्या मुलाला प्रत्येकी तीन हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केली आहे. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये पतीने पत्नीचे विवाहबाह्य संबंध असून तिचा मुलगा दुसऱ्या पुरुषामुळे जन्माला आला आहे, असा दावा केला व त्या मुलाचे पितृत्व नाकारले. तसेच, वरील वक्तव्य देखील केले.
याशिवाय, पत्नी स्वत:हून वेगळी झाली, अशी माहिती देत पत्नी व मुलाला पोटगी मंजुर करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. याचिकेवरील अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्याकरिता पतीला फटकारले व रेकॉर्डवरील विविध बाबी लक्षात घेता त्याची याचिकाही गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला.