नागपूर : मांसाहारी खवय्यांचा ठिय्या म्हणून प्रसिद्ध असलेले व रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या मोमिनपुऱ्यातील एम. एल. कॅन्टीनचे अवैध बांधकाम गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने भुईसपाट केले. या कारवाईला असामाजिक तत्वांकडून विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे तगड्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे पथक सकाळी ८ वाजताच्या सुमारास हे अतिक्रमण तोडण्यासाठी धडकले. जेसीबी व मनुष्यबळाचा वापर करून एम. एल. कॅन्टीनचे १३ हजार ४०० चौरस फुटाचे अवैध बांधकाम तोडण्यात आले. महापालिकेने ही जमीन मुस्लीम लायब्ररीला ३० वर्षांसाठी लीजवर दिली होती. मात्र, या जमिनीवर अवैध बांधकाम करून येथे एम. एल. कॅन्टीन चालविले जात होते. याविरोधात २०१५ मध्ये उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या ३१ मार्च २०१७च्या आदेशावर महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम ८१ बी (३) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. यानुसार अतिक्रमणविरोधी पथकाने १० मे रोजी कारवाई सुरू केली.
जेसीबीच्या मदतीने दक्षिण व पश्चिम भागातील दोन खोल्या तोडण्यात आल्या. या कारवाईदरम्यान सुमारे दोनशे लोक एकत्र आले व त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे पथकाला कारवाई थांबवून परतावे लागले होते. अखेर गुरुवारी तगडा पोलीस बंदोबस्त लावून हे कॅन्टीन भुईसपाट करण्यात आले. ही कारवाई उपायुक्त अशोक पाटील, अधीक्षक श्रीकांत वैद्य, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता श्याम धरममाळी, अभिजीत नेताम, राजेश तेलरांधे व चमूने केली.