- सुमेध वाघमारे नागपूर : ‘नर्सिंग सीईटी-२०२४’ ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सीईटी कक्षामार्फत राज्यातील विविध जिल्हयातील परीक्षा केंद्रावर आज मंगळवारी आॅनलाईन पध्दतीने तीन सत्रात घेण्यात आली. ही परीक्षा घेण्यासाठी केंद्र नरीक्षकांना परीक्षेच्या २० तासांपूर्वी कळविण्यात आले. काहींना तर रात्री उशीरा याची माहिती मिळाल्याने गोंधळ उडाला. असे असताना, ही परीक्षा शांततेत पार पडली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शुश्रुषा संवर्गाशी संबंधित बी.एस्सी. नर्सिंग, एएनएम व जीएनएम अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘एमएच नर्सिंग सीईटी-२०२४’ ही प्रवेश परीक्षा २८ मे रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातील १२५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा सकाळी ७.३० वाजता, सकाळी ११ वाजता तर दुपारी २.३० वाजता अशा तीन सत्रात घेण्यात आली. सुत्रानूसार, वैद्यकीय शिक्षण विभागाने ही परीक्षा घेण्यासाठी अनुभवी अधिकारी/ कर्मचारी यांची ‘वेन्यू आॅफिसर’ निरीक्षक म्हणून त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पाठविण्याचे पत्र सोमवारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयांना दिले. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता त्यांची नावे ई-मेलद्वारे कळविण्याचा सूचनाही केल्या. मात्र काही जण उन्हाळी सुटीवर असल्याने, तर कोणाला बरे नसल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचा मॅसेज उशीरा मिळाला. यातील काही पोहचू शकले तर काहींना पोहचण्यास उशीर झाला, ज्यांची प्रकृती खराब होती त्यांनी वैद्यकीय कारण पुढे केल्याची माहिती. एवढ्या मोठ्या स्वरुपात ‘नर्सिंग सीईटी’ची परीक्षा घेताना वैद्यकीय शिक्षण विभागाचे नियोजन चुकल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली.