कमलेश वानखेडे
नागपूर : अजनीवन परिसरात आयएमएस प्रकल्पासाठी कापण्यात आलेली हजारो झाडे तसेच कोराडी वीज प्रकल्पामुळे होणारे प्रदुषण हे मुद्दे आपण स्वत: विधानसभेत उचलणार, सरकारला जाब विचारणार, असे सांगत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणवाद्यांना आश्वस्त केले.
आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात दाखल होते पर्यावरण कार्यकर्त्यांची भेट घेत सुमारे तासभर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी अजनी रेल्वे स्टेशन परिसरात होत असलेल्या आयएमएस प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली. पर्यावरण कार्यकर्त्यांनी अजनीवन परिसरात नव्याने आयएमएस प्रकल्पचे काम सुरू केल्याची माहिती दिली. या भागात बेकायदेशीर पणे हजारच्या जवळपास झाडे कापण्यात आल्याचे सांगितले. यातील बहुतेक झाडे हेरिटेज गटात मोडणारी होती. त्यांच्या विरोधात काही कारवाई झाली नाही. आएमएस प्रकल्प नावापुरता रद्द करण्यात आला आणि आता नव्या पद्धतीने पुन्हा सुरू करण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली. ठाकरे यांनी या प्रकल्पाची उपयोगिता आणि होणारे नुकसान याची माहिती घेतली. महाविकास आघाडी सरकारने अजनी वन ला स्थगिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय त्यांनी कोराडी वीज प्रकल्पाच्या प्रदूषणाची सद्य स्थिती आणि नव्या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. कोराडीतील सहा युनिट बंद करून ६६० मेगावॅटचे दोन प्रकल्प आणण्यात येत आहे. जे लोकेशन बंद होत आहे तिथे रोजगार जाणार आहे. त्यांच्या रोजगाराचे पुढे काय ? सगळे युनिट एकाच ठिकाणी आणून स्थानिक रहिवाशांचे जीवन अधिक खालावणार असल्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला. या सर्व प्रकल्पाविषयी विधानसभेत मुद्दा उचलण्याची ग्वाही दिली. जून महिन्यात नागपूरला पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्याची योजना असून त्यात सर्व प्रकल्पांविषयी सविस्तर चर्चा आणि जनजागृती करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लिना बुधे, अनसूया काळे छबरणी, कुणाल मौर्य, प्राची महुरकर, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
-नांदगाव ‘ॲशपॉण्ड’ ग्रस्तांशी संवाद
- आदित्य ठाकरे यांनी कोराडी खापरखेडा वीज केंद्रातील राख साठविण्यात येणाऱ्या नांदगाव ‘ॲशपॉण्ड’ची पुन्हा एकदा भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘ॲशपॉण्ड’ग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. येथे पुन्हा राखेची साठवणूक सुरू झाली असल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर त्यांनी वराडा येथे भेट देऊन गुप्ता कोल वॉशरीजमुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कोल वॉशरीज विदर्भात वाढत चालली आहे. आपण पर्यावरण मंत्री असतांना हे थांबिविले होते, असेही त्यांनी सांगितले. आज आपला दौरा आहे व रस्त्यांवर कोळशाचा काळा थर दिसू नये म्हणून पाणी मारण्यात आल्याचे दिसते, असे सांगत हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. या दौऱ्यात माजी खा. प्रकाश जाधव, जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले, शहर प्रमुख नितीन तिवारी, हर्षल काकडे आदी सहभागी झाले.