नागपूर/पाटणसावंगी : वाकी (ता. सावनेर) परिसरात फिरायला गेलेल्या सहा जणांपैकी चाैघे कन्हान नदीच्या डाेहात बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. यात एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचे शाेधकार्य सुरू करण्यात आले.अंधार हाेईपर्यंत शाेधकर्त्यांच्या हाती काहीही गवसले नाही.
विजय ठाकरे (१८), साेनिया मरसकाेल्हे (१७, दाेघेही रा. नारा, नागपूर), अंकुश बघेल (१७) व अर्पित पहाळे (१९, दाेघेही रा. कामठी) अशी बुडालेल्यांची तर साक्षी कनाेजे (१८, रा. पाटणकर चौक, नागपूर) व मुस्कान राणा (१८, रा. जरीपटका, नागपूर) अशी बचावलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. हे सहाही जण मित्र असून, ते दाेन माेटारसायकलींनी ट्रिपल सीट गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाकी येथे फिरायला आले हाेते. त्यांनी ताजुद्दीनबाबांच्या दर्ग्यात दर्शन घेतले आणि कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले.
विजय पाेहण्यासाठी डाेहात उतरला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी आधी साेनिया, नंतर अंकुश व अर्पित पाण्यात गेले आणि बुडाले. माहिती मिळताच खापा पाेलिसांनी घटनास्थळ गाठून एसडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. वृत्त लिहिस्ताेवर कुणीही गवसले नव्हते. शाेधकार्य शुक्रवारी (दि. १८) सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार मनाेज खडसे यांनी दिली.
जीवघेणा डाेह अन् पाेहण्याचा माेह
या डाेहात अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याने हा डाेह जीवघेणा ठरला आहे. डाेहात मरणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुण नागपूर शहरातील आहेत. या डाेहात उतरण्यास मनाई असून, तसे सूचना फलक लावले आहेत. मात्र, कुणीही या फलकांकडे लक्ष देत नाही. हा डाेह खूप खाेल असून, आत उंच सखल आहे. शिवाय, त्याला कपारी आहेत, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
स्थानिकांची मदत घ्या
पाेलिसांनी मदत कार्य घटनेच्या तीन तासांनंतर सुरू केले. यासाठी एसडीआरएफच्या जवानांची मदत घेण्यात आली. मुळात एसडीआरएफच्या जवानांच्या तुलनेत या डाेहाचे स्वरूप आणि खाचखळगे याबाबत स्थानिक पट्टीच्या पाेहणाऱ्यांना चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. त्यांनी अनेक मृतदेह याच डाेहातून बाहेर काढले आहेत. त्यामुळे पाेलिसांनी स्थानिकांची मदत घ्यावी, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.