नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टी सिग्लन भागातून अपहरण करण्यात आलेल्या ८ महिन्यांच्या चिमुकल्याची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी रात्री पाच तासांत पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करुन चिमुकल्याचा छडा लावला. शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यानेच हे अपहरण केले होते व यामागे मुले पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याची बाब समोर आली आहे.
गुरुवारी डिप्टी सिग्नल परिसरातून राजकुमारी राजू निषाद यांच्या ८ महिन्यांच्या चिमुकल्याचे गुरुवारी अपहरण करण्यात आले होते. परिसरात तसेच ओळखीच्यांकडे शोधाशोध करण्यात आली. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे महिलेने कळमना पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कळमना पोलीस ठाण्यात पोहोचले. विविध पथके बनवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या योगेंद्र व रिता प्रजापती यांचा शोध सुरू केला. नागरिकांनी दिलेली माहिती, खबऱ्यांचे जाळे, गुप्तचर यंत्रणा व इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून दोघांनी बाळाला इंदोरा येथील एका दाम्पत्याला अडीच लाखात बाळ विकल्याची बाब समोर आली.
पोलिसांनी इंदोरा येथून पहाटे तीन वाजता बाळाची सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी फरजान उर्फ असार कुरेशी (४०, कुंदनलाल गुप्तानगर), सीमा परवीन अब्दुल रौफ असारी (३८, विनोबा भावे नगर), ऑटोचालक बादल मडके (३५, पाचपावली), सचिन रमेश पाटील (४५, जरीपटका) या आरोपींना अटक केली आहे. दत्तक मुलांच्या संबंधित अगोदरदेखील गुन्हे दाखल असलेल्या बालाघात येथील श्वेता खान या महिलेने या बाळाचा अडीच लाखात सौदा केला होता. संबंधित दाम्पत्याकडून पैसे घेतल्यावर सीमा खान तसेच योगेंद्र व रीता प्रजापती फरार झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेचे युनिट २ व पाचचे पथक, कळमना-यशोधरानगर व पारडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.