नागपूर : जिथे विचारांचे नाही तर धर्म व जातीचे राजकारण असेल तिथे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्यासारख्या विचारकांचे मारेकरी कधीच सापडणार नाहीत आणि महात्मा गांधी वारंवार मारले जातील, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशिवार यांनी आज येथे केले.
बुधवारी दक्षिणायन, महाराष्ट्रच्या वतीने हिस्लॉप कॉलेजच्या शॅलोम सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे संपादित ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर पार पडलेल्या ‘अभिव्यक्ती आणि वास्तव’ या विषयावरील परिचर्चेत द्वादशिवार अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. बबन तायवाडे, रणजित मेश्राम, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ उपस्थित होते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तर सर्वप्रथम निर्बंध घातले ते धर्मसत्तेने आणि जातींनी. लिहायचे तर धर्म-जातींना पोषक, अनुकूल असे लिहा, एवढेच स्वातंत्र्य दिले. या देशात विचारांची सत्ता, राजकीय पक्ष कधी उभ्या झाल्या नाहीत. सर्व राजकीय पक्ष जातींच्याच उभ्या राहिल्या. त्यामुळे, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बोलणेच मुर्खपणाचे आहे आणि त्यामुळेच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्यासारख्या विचारकांच्या हत्या होतात आणि त्यांचे मारेकरी कधीच सापडत नाहीत. महात्मा गांधी सातत्याने मारले जातात. महात्मा गांधींना महाष्ट्रातील ललित लेखकांनी कायम विरोध केला आणि साने गुरुजींच्या सारख्या खऱ्या लेखकांना गांधींचे प्रचारक म्हटले गेले. मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी यांना गांधी कधीच पटले नाहीत आणि गांधीवाद्यांनी गांधींचा चरखा व सूत वगळता गांधीविचार कधीच बाळगला नाही, अशी टीका सुरेश द्वादशिवार यांनी यावेळी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अरुणा सबाणे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले.
..................