नागपूर : मोमीनपुरा बाजार हा केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. दररोज हजारो लोक यातही महिला मोठ्या प्रमाणावर येथे येतात. असे असुनही येथे महिलांसाठी एकही शौचालय नाही. विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तीन-तीन महिला नगरसेविका या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात तरीही महिलांसाठी सर्वात महत्त्वाच्या या सुविधेकडे दुर्लक्ष होणे आश्चर्यजनक बाब आहे.
मोमीनपुरा येथील बाजारात नागपुरातीलच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी येतात. महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. मोमिनपुरा येथे कॉस्मेटिक वस्तुंसह विविध प्रकारच्या वस्तू मिळतात. रमजान महिन्यात तर येथे पाय ठेवायलाही जागा नसते. महिलांची गर्द विशेष असते. अशा परिस्थितीत या बाजारात महिलांसाठी एकही शौचालय नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. खूपच आवश्यकता निर्माण झाली तर स्थानिक लोकांच्या घरी जावे लागते. त्यासाठी लोकांना विनंती करावी लागते. यासंदर्भात अनेक सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी, महापौर, मनपा आयुक्त यांना भेटून निवेदन सादर केले. परंतु काहीही झाले नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महिलांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
- जुडी गल्लीतील एका शौचालयावर कब्जा
स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे की, येथील जुटी गल्ली अब्दुल अजीज काॅम्प्लेक्समध्ये एक शौचालय आहे. परंतु त्यावर कब्जा करण्यात आला आहे. खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलांना त्याचा कुठलाही उपयोग मिळत नाही आहे. मनपाचे पथक एकदा येऊन गेले. परंतु कारवाई न करताच ते परत गेले. याशिवाय एक शौचालय पुरुषांसाठी रहमान हॉटेल चौकात आहे. पण तो काहीही कामाचा नाही.
-