नागपूर : विधी क्षेत्रातील सर्वोच्च मापदंड आणि आयुष्याच्या प्रवासात सर्वोत्तम काय करावे याची शिकवण मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून मिळाली आहे. सामाजिक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी विचार करण्याची क्षमता तसेच त्याच्याशी लढण्याची प्रेरणा येथूनच मिळाली आहे. या महाविद्यालयाला मोठा इतिहास असून अनेक नामवंत विधीज्ञ या महाविद्यालयाने दिले आहेत. मला देखील या स्थानावर पोहोचण्याचे श्रेय या विधि महाविद्यालयाचेच आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू. सांबरे यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात २१ वा वार्षिक राष्ट्रीय कायदा महोत्सव ‘जस्टा काॅजा’ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, संयोजक डॉ. प्रवीणा खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यायमूर्ती सांबरे म्हणाले, १९८८ मध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना निर्माण झालेले ऋणानुबंध आजही तसेच कायम आहेत. १९९१-९२ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून निवडून आलो. त्यावेळी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील महाविद्यालयीन विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी होते. मात्र ते विरोधी पॅनलचे होते, असा अनुभव त्यांनी यावेळी त्यांच्या भाषणात विशद केला. या महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना आहे. माजी विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय विसरत नसल्याचेही ते म्हणाले. १९८९ मध्ये महाविद्यालयात झालेल्या वादविवाद स्पर्धेत सहभागी झाल्यानेच मंचावर उभे राहण्याचे धाडस निर्माण झाले. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत कठीण परिश्रम करीत समाजातील समस्यांची सोडवणूक करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांनी केले. संचालन सुप्रिया रानडे व हर्षदा यांनी केले तर आभार संयोजक डॉ. प्रविणा खोब्रागडे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. समय बनसोड, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे, ॲड. फिरदोस मिर्झा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.