नागपूर : जंगलात वाढलेला मानवी शिरकाव आणि दळणवळणाच्या सुविधेसाठी जंगलाच्या मधूनच होणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामामुळे मानव आणि वन्यप्राण्यांतील संघर्ष वाढताना दिसत आहे. चतुष्पाद वर्गातील व्याघ्र परिवारातील बिबट हा हिंस्र प्राणी तर आता राजरोस शहरात शिरतानाही आढळतो.
मंगळवारी रात्री एक बिबट महामार्गावरच ठाण मांडून बसलेला असतो. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला तो दिसणार नाही म्हणून एका कारचालकाने वाहन तेथेच थांबवून त्याच्यावर हेडलाइट रोखून ठेवले होते. शेजारीच एक बसही थांबली होती, असे असतानाही विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला तिथे बिबट बसला असल्याचे दिसले नाही आणि अगदी पाच-सात पावलांवर असतानाच दुचाकीस्वाराला आपल्यासमोर अगदी थाटात बिबट बसला असल्याचे दिसताच त्याची पाचावर धारण बसली आणि आल्यापावली दुचाकी वळवून तो फुर्रर्र झाला.
हे सर्व चित्रण कारचालकाने मोबाइलमध्ये कैद केले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, ही घटना कोराडी मार्गावरील नांदा फाटा तलावाच्या जवळील पुलाजवळ असल्याचे सांगितले जात आहे, तर काही जण सावनेर पुलाजवळचा असल्याचे सांगत आहेत. काही जणांनी हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचाही दावा केला आहे. मात्र, व्हिडीओतील भाषा ही वैदर्भीय टच असलेल्या हिंदीतील आहे.