कमल शर्मा
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारचा दिवस हा भारनियमनमुक्त असल्याचा दावा महावितरण करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली; परंतु काही तासांतच महापारेषणच्या कळवा येथील लाेड डिस्पॅच सेंटरने एक माहिती जारी करीत दुपारी २ वाजेपासून भारनियमन केले जात असल्याचे जाहीर केले आणि महावितरणचे पितळ काही तासांतच उघडे पडले. या घटनेमुळे ऊर्जा विभागाची चांगलीच पंचाईत झाली असून, ऊर्जा मंत्रालय आणि वीज कंपन्या यांच्यात समन्वय जवळपास संपले असल्याचे यातून दिसून येते.
महावितरणने गुरुवारी दुपारी सोशल मीडियाचा वापर करीत गुरुवारी राज्यात भारनियमन न करता महामानवास अनोखे अभिवादन करीत असल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणने ६६० मेगावॉट वीज खरेदी केल्याचा दावाही करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना अखंडित वीज पुरवठा केला जात आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या क्षेत्रात २२,५०० मेगावॉट विजेची मागणी नोंदवण्यात आली. सायंकाळी सुद्धा जास्तीत जास्त वीज पुरवठा करण्यासाठी ते तयार आहेत, असेही सांगण्यात आले. ट्विटरपासून फेसबुकपर्यंत यासंदर्भातील पोस्ट टाकून कंपनीने स्वत:चीच पाठ थोपटून घेतली; परंतु दीड तासानंतरच महापारेषणने मागणी व पुरवठा यातील अंतर वाढल्याने भारनियमन करण्याचा आदेश जारी केला. लाेड डिस्पॅच सेंटरने या आदेशानंतर जी-२ क्षेत्रात (६६ ते ७४ टक्के हानी असलेले भाग) वीज कपात सुरू केली. ही बाब उघडकीस येताच स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी तोंडाला कुलूप लावून घेतले.
१२० कोटींची थकबाकी सीजीपीएलला मिळाली नाही
राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर गुजरात पॉवर लिमिटेड (सीजीपीएल) कडून ७६० मेगावॉट वीज खरेदी सुरू झाली आहे; परंतु सीजीपीएलला अजूनपर्यंत थकीत १२० कोटी रुपये मिळालेले नाहीत. यासाठी पत्र लिहूनसुद्धा मागणी करण्यात आली आहे. महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, कंपनीला लवकरच थकबाकी देऊन वीज देण्यास तयार केले जाईल; परंतु जर तातडीने पैसे देण्यात आले नाही तर वीज पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.