नागपूर : नागपूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या कामठी स्थानकाचा अमृत भारत योजनेंतर्गत विकास केला जाणार आहे. मोठ्या जिल्ह्यांसोबतच छोट्या शहरांच्या रेल्वेस्थानकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेल्या कामठी स्थानकाचा यात समावेश करण्यात आला आहे. १८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून कामठी स्थानकावर विविध विकासकामे केली जाणार आहेत.
कामठी येथे कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वात मोठी लष्करी छावणी असल्याने इथे राहणारे अधिकारी आणि जवानांसह देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. रेल्वेस्थानक सल्लागार समितीचे मोहनलाल शर्मा, जयप्रकाश तिवारी तसेच विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी कामठी रेल्वेस्थानकाच्या विकास कामांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले होते. या कामाचे लवकर भूमिपूजन होणार आहे.