योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे तर कॉंग्रेसमधून नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत. महाविकासआघाडीची लढाई ही केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच आहे व त्यावरूनच त्यांच्यात धुसफूस आहे. मात्र महायुतीकडून राज्यात डबल इंजिन सरकार यावे व राज्याचा विकास व्हावा यासाठी निवडणूकीची तयारी सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. त्यांनी ठाकरेंचा वापर करून घेतला आहे. ठाकरे ते कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत भेटले. मात्र कुणीही त्यांना गंभीरतेने घेतले नाही. कॉंग्रेस किती बेईमान आहे हे आता उद्धव ठाकरे यांना कळले असेल, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.
महायुतीतील घटक पक्षांच्या नेते-पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात वक्तव्ये करू नयेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. महायुतीत समन्वय रहावा हाच सर्वांचा प्रयत्न आहे. खा.अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाविरोधातील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नितेश राणे यांच्या एका वक्तव्यावरून वाद सुरू आहे. प्रत्यक्षात त्यांनी अकोल्यातील व्हिडीओबाबत वक्तव्य केले होते. जनतेच्या भावना भडकविणाऱे व्हिडीओ काही जण जाणुनबुजून टाकत आहेत. राणे यांनी अशा तत्त्वांवर भाष्य केले.देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.