नागपूर : राज्यातील सध्याच्या स्थितीत भाजप ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. आवश्यकता भासेल तेव्हा जनहितार्थ कोअर टीम योग्य निर्णय घेईल. परंतु सध्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही याबाबत आत्मचिंतन करावे. जर बहुमत नसेल तर त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते मंगळवारी नागपुरात बोलत होते.
२२ ते २४ जून या कालावधीत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात शासन निर्णय जारी केले. एकीकडे राज्यात अस्थिर परिस्थिती असताना काही लोक स्थिर मनाने शासन निर्णय काढत पैसे कमविण्याचे उद्योग करत असल्याची शंका आम्हाला आली होती. त्यामुळेच राज्यपालांना आमच्या पक्षातर्फे निवेदन देण्यात आले होते. त्या आधारावर त्यांनी राज्य शासनाकडून माहिती मागविली आहे व त्यांचे कर्तव्य बजावले आहे. राज्यपालांनी आक्षेप घेतलेला नाही. त्यांनी केवळ माहिती मागितली आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
राऊतांच्या बोलण्यावर भाष्य नाही
संजय राऊतांच्या बोलण्यावर भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. राज्यात जेवढी अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचे मनदेखील चंचल व अस्थिर होईल. अशा मन:स्थितीत ते काय भाष्य करतील याचा भरवसा नाही. राज्याला वराह, रेडे यासारखे काही शब्द नवनवीन शब्द ऐकावे लागतील, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.
..म्हणून आमदारांना राज्यात राहण्याचे निर्देश
पक्ष राज्यातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. चुकून आमदार विदेशात गेले, न सांगता राज्याबाहेर गेले तर आवश्यकता भासेल तेव्हा अडचण होईल. त्यामुळे त्यांना राज्यात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदारसंघात राहून जनतेचे प्रश्न सोडवा. पेरणी, खते, बियाणांच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष द्या, अशा सूचनादेखील पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.
चिखलीकरांची भूमिका पक्षाची नाही
खासदार चिखलीकरांनी लवकरच राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल, असा दावा केला. मात्र त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही. पाऊस येणार असल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांना येतो व ती त्यांना पेरणीची योग्य वेळ वाटते. तसेच आमच्या पक्षातील काही लोकांनी राजकीय आकलन करून अशी भूमिका मांडली असेल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.