नागपूर : पिंपरी चिंचवडमध्ये ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या करून फरार झालेल्या तरुणाला नागपुरात सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. नवीन प्रेयसी मिळाल्याने त्याने ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या केली. पोलिसांनी आरोपी तरुणाला त्याच्या मैत्रिणीसह ताब्यात घेतले आहे.
पुण्यात राहणाऱ्या २० वर्षीय आशिष भोसलेची दीड वर्षापूर्वी साताऱ्यातील कीर्ती नावाच्या तरुणीशी मैत्री झाली होती. कीर्तीला एका कपड्याच्या शोरूममध्ये नोकरी लावून दिली. कुटुंबीय कीर्तीसोबतच्या मैत्रीच्या विरोधात असल्याने आशिषने घरातून पळ काढला आणि पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये नऊ महिन्यांपासून कीर्तीसोबत लिव्ह इनमध्ये पतीसारखा राहू लागला. आशिष काम करत असलेल्या शोरूममध्ये डायना नामक तरुणी नोकरीला लागली व दोघांची जवळीक वाढली. दोघे प्रेमात पडले. हे जाणून कीर्तीला धक्का बसला. कीर्ती प्रेमात अडथळा ठरत असल्याने आशिषने तिचा छळ सुरू केला. त्यांनी तिचा काटा काढण्याची योजना आखली आणि १९ जुलै रोजी तिची हत्या केली. कीर्तीने आत्महत्या केल्याचे त्याने डायनाला सांगितले व आशिषच्या सांगण्यावरून ती मुंबईत राहायला गेली.
दरम्यान, कीर्तीच्या भावाच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी आशिषविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांना प्रेयसी डायनाही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. डायनाच्या कुटुंबीयांनीही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस दोघांचा शोध घेत होते. आशिष आणि त्याची मैत्रीण डायना नागपुरात असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंप येथे मोबाइलचे लोकेशन आढळून आले. वाकड पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, अमोल कचोरे यांनी पेट्रोल पंपाजवळून दोघांनाही ताब्यात घेतले. ट्रॅव्हल्स बसने पुण्याला जाण्यासाठी दोघेही तेथे पोहोचले होते. २० जुलै रोजी दोघेही वाकडहून मुंबईला गेले. तेथून ते नागपुरात परतले. सीताबर्डी पोलिसांच्या माहितीवरून वाकड पोलीस शुक्रवारी नागपुरात दाखल झाले व दोघांनाही त्यांच्या ताब्यात देण्यात आले.