नागपूर : समृद्धी महामार्गाचे डिझाइन वाहनांची गती १५० किमी प्रति तास राहील हे लक्षात घेऊन तयार केले आहे. सध्या अपघात व टायर फुटण्याच्या घटना लक्षात घेत समृद्धीवर १२० किलोमीटर प्रति तास वाहनांची वेगमर्यादा निश्चित केली आहे, अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
देसाई म्हणाले, वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी स्पीड गन लावण्यात येईल. पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवली जाईल. एक्झिट पॉइंटवर ही वाहने ठेवली जातील. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरही भरधाव गाडी चालवणाऱ्या चालकास समोरच्या नाक्यावर थांबवून मार्गदर्शन केले जात आहे. आमदार रईस शेख यांच्या वाहनांचे टायर फुटल्याची माहिती दिली. आदित्य ठाकरे यांनी लेन कटिंग व सिग्नल तोडणे हा मुद्दा उपस्थित केला. गती वाढवली तर टायर फुटताहेत. आता थंडी आहे. उन्हाळ्यात काय होईल ? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.