नागपूर : अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीत अंबिका फार्म हाऊसचा आनंद लुटल्यानंतर, सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सदस्यांना जंगल सफारीचा योग आला. निवडणूक १ नोव्हेंबरला असली तरी लक्ष्मीपूजन आटोपून काँग्रेसचे सदस्य घराबाहेर पडले. वाघ दर्शनाचा आग्रह असल्याने कऱ्हांडल्याची सफारी शुक्रवारी केली. याच सफारीत वाघ दर्शन झाल्यामुळे ताडोब्याचा योग हुकला. त्यामुळे परतीचा मार्ग धरीत कळमेश्वर मधील नील फार्मवर सदस्यांनी ठिय्या दिला. आता १ तारखेलाच सर्व सदस्य जिल्हा परिषदेत पोहचतील.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य असतानाही काँग्रेसला बंडखोरीची भीती आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी माजी मंत्री सुनील केदार स्वत: या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे विदेशात असून, ते ३१ ऑक्टोबर रोजी नागपुरात पोहचणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तीन सदस्यांनी बंडखोरी केली होती. निवडणूक पार पडल्यानंतर काही सदस्यांनी अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली होती. सभापतीच्या निवडणुकीत पुन्हा बंडखोरी उद्भवू नये म्हणून सर्व सदस्यांना एकत्र ठेवल्या जात आहे. कुणाशी बोलण्याला, पत्रकारांना माहिती देण्यासही निर्बंध घातले आहे. शुक्रवारी सकाळीच सदस्यांनी कऱ्हांडल्यात धडक दिली. दिवसभराच्या जंगल सफारीत त्यांना वाघाचे दर्शनही घडले. सभापतीसाठी काँग्रेसमध्ये डझनभर इच्छुक आहे. अशात एक जागा राष्ट्रवादीलाही सोडायची आहे. अशात ही घडी बसविणे नेत्यांसाठी डोकेदुखी आहे.
- नानांची मनधरणी
जिल्हा परिषदेतील ज्येष्ठ काँग्रेस सदस्य नाना कंभाले यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत बंडखोरी करून आपल्याच पक्षाची चांगलीच पोलखोल केली होती. ते विरोधी बाकावर बसल्यास पुढचे अडीच वर्ष काम करताना काँग्रेसला अवघड जाणार आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांकडून नानांची मनधरणी सुरु आहे. नानांनी ही बाब स्वत: मान्य केली असून, १ नोव्हेंबरला आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुन्हा काँग्रेस कंपूत परतल्यास सभापतीपदाचा पुन्हा एक दावेदार वाढेल. तो इच्छुकांसाठी डोकेदुखी ठरेल.
- जलव्यवस्थापन समितीची पहिलीच सभा तहकूब
नवनिर्वाचित अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेत जलव्यवस्थापन समितीची पहिली सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. परंतु काँग्रेसचे सदस्य जंगल सफारीवर असल्याने पहिलीच सभा तहकूब करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सभा तहकूब करण्यात आल्याचे संदेश कालच समितीच्या सदस्यांना पाठविण्यात आल्याच माहिती आहे.