नागपूर : हवामान विभागाने आजही उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला हाेता, पण विदर्भातील शहरांचा पारा साेमवारी आश्चर्यकारकरित्या घसरला. तापमान घटले असले, तरी दिवसभर उन्हाच्या झळांनी चांगलेच चटके दिल्याने नागरिकांचा त्रास वाढला. सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांचीही गर्दी जमली हाेती.
नागपुरात रविवारी ४४.३ अंश तापमानाची नाेंद झाली हाेती. यात १.१ अंशाची घट हाेत पारा ४३.२ अंशावर खाली आला. अकाेल्यात ४५.५ अंशावर असलेले तापमान २४ तासांत २.७ अंशाने घसरत ४२.७ अंशावर आले, तर अमरावतीमध्येही पारा २.४ अंशाने घटत ४३ अंशावर आला. २४ तासांत सर्वाधिक ५.५ अंशाची घसरण यवतमाळात झाली. येथे साेमवारी ३८ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. वर्ध्यात ४३.१ अंशाची, तर चंद्रपुरात ४३ अंशाची नाेंद झाली. या घसरणीने नागपूर, अकाेला, अमरावती वगळता इतर शहरांत पारा सरासरीच्या खाली गेला. पारा घसरला तरी, उन्हाच्या झळांचा त्रास कायम हाेता. दिवसभर लाेक सावलीचा शाेध घेताना दिसले.
दिवसाचे तापमान घटले असले, तरी रात्रीच्या पाऱ्याने उसळी घेतली आहे. नागपुरात २४ तासांत ३ अंशाची वाढ हाेत २६.२ अंशाची नाेंद झाली. अकाेला, वर्धा, यवतमाळात किमान तापमान २७ अंशाच्या वर हाेते. इतर शहरात पारा २४ ते २६ च्या सरासरीत हाेता. दरम्यान, काही शहरांमध्ये सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले हाेते. मात्र यामुळे उष्णतेच्या त्रासात कुठलाही फरक पडला नाही. पाऱ्यातील असा चढ-उतार पुढचे काही दिवस दिसून येईल, असा अंदाज आहे.