नागपूर : आकाश निरभ्र व वातावरण काेरडे हाेताच रात्रीचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत नागपूरचे किमान तापमान १.८ अंशाने घसरून १५ अंश सेल्सिअसवर पाेहोचले आहे. पारा सरासरीपेक्षा ३ अंशांनी खाली आल्याने थंडीची जाणीव हाेऊ लागली आहे. १४.५ अंशांवर असलेल्या यवतमाळनंतर नागपूर विदर्भातील दुसरे सर्वात थंड शहर ठरले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाेव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात रात्रीचे किमान तापमान १७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुष्कता वाढून तापमान घसरण्याचे सत्र सुरू हाेईल. दरम्यान, साेमवारी नागपूरचे कमाल तापमान १ अंशाने घसरून २९.८ अंशांवर खाली आले. नागपुरात सकाळी ८.३० वाजता ७१ टक्के आर्द्रता नाेंदविण्यात आली, जी सायंकाळी घसरून ५३ टक्क्यांवर पाेहोचली. यवतमाळ व नागपूरशिवाय अमरावती १५.५ अंश, गाेंदिया १५.६ अंश हाेते. उर्वरित जिल्ह्यात रात्रीचा पारा १६ ते १७ अंशांच्या आसपास हाेता. दिवसाच्या तापमानाबाबतही नागपूर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर हाेते. २९.२ अंशांसह गाेंदियात सर्वात कमी तापमान नाेंदविण्यात आले.