नागपूर : साेमवारी नागपुरात दिवसाचे तापमान चक्क ३.३ अंशाने वाढून ३६.६ अंशावर गेले. विदर्भात सर्वत्र पारा सरासरी २ ते ३ अंशाने वधारला आहे. एकीकडे पाऱ्याने उसळी घेतली असताना दमट वातावरणामुळे दिवसभर उकाड्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप दिला. मंगळवारपासून मात्र विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
साेमवारी सकाळपासून सूर्याचा ताप अधिक जाणवत हाेता. आकाश ढगाळलेले हाेते; पण सूर्यकिरणांचे चटके राेखू शकले नाही. ऊन-सावलीचा खेळ दिवसभर चालला. पावसाळ्याच्या आर्द्रतेने तयार दमट वातावरणाची उष्णता अधिक त्रासदायक ठरली. अंगातून घामाच्या धारा निघत हाेत्या. वाढलेले तापमान पाहता हा त्रास नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सहन करावा लागला. सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपुरात ३७.८ अंश व वर्ध्यात ३७.५ अंश नाेंदविण्यात आले. २४ तासात सर्वाधिक ५.३ अंशाची वाढ गाेंदिया येथे झाली. येथे ३५.८ अंशावर तापमान नाेंदविले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशाने वधारला आहे. दिवसाप्रमाणे रात्रीच्या तापमानातही वाढ झाली असल्याने रात्रीही उकाड्याचा त्रास जाणवत हाेता. पावसाची नाेंद कुठेही झाली नाही.
दरम्यान बदलत्या परिस्थितीमुळे मंगळवारपासून वातावरण पालटेल, असा अंदाज आहे. ४ ते ८ जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पाऊस हाेण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.