नागपूर : नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नवरात्रीच्या पर्वावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांना सम्मानित केले. याप्रसंगी सगळ्यांना रस्ता सुरक्षिततेची माहिती देत, घराघरात हा संदेश पोहचवण्याचे आवाहनही करण्यात आले.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी महिलांना वाहतुक नियमांचे शिक्षण देत, वाहतूकीचे प्रशिक्षण देत, त्याची अंमलबजावणी करीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांनी नागपूर शहर, ग्रामीण व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र आणून सावित्री पथक स्थापन केले. पथकाने आतापर्यंत दीड लाखांवर महिलांमध्ये वाहतूक नियमांना घेऊन जनजागृती केली.
या कार्यक्रमाला पुढे नेत विविध क्षेत्रातील ‘ती’च्य कर्तुत्वाचा सन्मान शहर आरटीओ कार्यालयातील सभागृहात करण्यात आला. यात स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. निवेदिता आनंद कामडी, व्ही. टी. कॉन्वेन्टच्या प्राचार्य राखी परमार, उच्च न्यायालयाच्या सहाय्यक सरकारी वकील मयुरी देशमुख, पोलीस विभागातील कोमल सागळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, देसाई ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालीका उषा देसाई, संगीत विशारद साधना केजकर, सामाजिक कार्यकर्त्या अनिता दारव्हेकर, मनिषा सिस्टिमच्या संचालिका मनिषा पंचदाने यांचा समावेश होता. सगळ्यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भुयार यांच्या संकल्पनेतून झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना गडकरी, राजश्री एनुरकर आणि इतरांनी प्रयत्न केले. तर याप्रसंगी लोकमत समाचारच्या पत्रकार अर्चना सिंग- सोनी उपस्थित होत्या.