नागपूर : चंद्रपुरातील १७ वर्षीय मुलीचा विवाह पाचगाव येथे गुरुवारी होणार होता. बुधवारी लग्नाची तयारी सुरू होती. मुलीला हळद व मेहंदी लावणे सुरू असतानाच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यासह पोलीस लग्नमंडपात पोहचले. गुरुवारी होणारा बालविवाह थांबविला.
पाचगाव येथे बालविवाह होत असल्यासंदर्भात चाईल्ड लाईनकडून जिल्हा महिला व बाल विकास विभागाला माहिती मिळाली. अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी तत्काळ पथक लग्नस्थळी पाठविले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना ठोंबरे, ग्रामसेवक प्रमोद वऱ्हाडे, सरपंच उषा ठाकरे, चाईल्ड लाईनच्या सुनीता गणेश, मंगला टेंभूर्णे, पोलीस शिपाई आशीष खंडाईत, चांगदेव कुथे, संजय या पथकाने लग्नमंडप गाठून मुलीच्या वयाची विचारणा केली. तेव्हा मुलगी १७ वर्षाची असल्याचे आढळले. मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील जामगाव येथील असून, पाचगाव येथे तिच्या मानलेल्या मामाकडे हा लग्नसोहळा आयोजित केला होता. पथक पोहचले तेव्हा तिला हळद लागत होती. पथकाने लगेच मुलीच्या पालकासह मुलाच्या घरच्यांनाही बोलावून घेतले. उपस्थित नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती दिली आणि पालकांकडून मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत लग्न करणार नाही, यासंदर्भातील हमीपत्र लिहून घेतले.
- १५ दिवसात दुसरा बालविवाह थांबविला
पंधरा दिवसांपूर्वी यशोधरानगर येथेदेखील बालविवाह सुरू असताना जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी लग्नस्थळ गाठून बाल विवाह थांबविला. कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर गेल्या सव्वा वर्षात जिल्हा महिला व बाल विकास विभागाने १३ बालविवाह थांबविले आहेत.