नागपूर : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या पतीचा मोबाईलरोकड मेडिकलमधून लंपास करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. अजनी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
मयुर अंबादास देवगडे (२४, गवळी, कारंजा घाटगे, वर्धा) हे मजुरीचे काम करतात. बेताच्या परिस्थितीमुळे त्यांनी पत्नीला डिलिव्हरीसाठी मेडिकल इस्पितळात आणले. तेथील वॉर्ड क्रमांक ३२ येथे ती दाखल होती. त्यांना मुलगी झाली. मात्र पत्नी व मुलीची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे २२ फेब्रुवारीच्या रात्री मयुर हे वॉर्डासमोरील वऱ्हांड्यातच झोपले. त्यांनी त्यांचा मोबाईल व रोख ८ हजारांची रक्कम एका पर्समध्ये ठेवली व ती पर्स डोक्याखाली ठेवली. अज्ञात चोरट्याने रात्री ती पर्स व मोबाईल लंपास केला. मयुरच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अजनी पोलीस ठाण्यातील पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून यात रोहीत इंद्ररसिंग रघुवंशी (२४, छिंदवाडा, मध्यप्रदेश) असल्याचे शोधले. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.