नागपूर : शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या वाहनचोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यातील एक जण हा विनयभंगाच्या प्रकरणात आरोपी असून तपासादरम्यान तो रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अरुण तरार यांची पांडे ले आऊट परिसरातून दुचाकी चोरी गेली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ११ एप्रिल रोजी शताब्दी नगर येथील संजू गिरीजाप्रसाद तिवारी (१८) याने प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोमिओगिरी करत एका मुलीच्या घरासमोर तमाशा करत तिचा विनयभंग केला होता. परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. तपासादरम्यान संजू वाहनचोरीदेखील करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने वाहनचोरी केली असल्याचे कबुल केले.
अनिकेत रवि इंदूरकर (२०, पठाण ले आऊट, प्रतापनग), प्रणय राजेंद्र डुले (२३, जुगलकिशोर ले आऊट, तिसरा बसस्टॉप, गोपालनगर) यांच्यासह चोऱ्या केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांच्याकडून १० दुचाकी ताब्यात घेतल्या. आरोपींनी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सहा, सिताबर्डीतून दोन तर हुडकेश्वर व धंतोलीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरी केली होती. दानिवसाय सांगसुरवार, विजय तिवारी, चंद्रमणी सोमकुवर, मनोज निमजे, चेतन चौधरी, विशाल घुगे, किशोर इंगळे, सारंग भरबत, किरण शेजवळ, अंकिता कुळकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.