नागपूर : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाची (एमपीएससी) परीक्षा यूपीएससीच्या पॅटर्नने घेण्याच्या निर्णयाविराेधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला अखेर यश मिळाले. विद्यार्थ्यांना आता पूर्वीच्याच पद्धतीने परीक्षा देता येईल आणि नवीन पॅटर्न २०२५ मध्ये लागू हाेईल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीला मान्यता दिली असून आयाेगाकडून लवकरच याबाबत अधिकृत घाेषणा हाेण्याची शक्यता आहे.
यूपीएससी प्रमाणे एमपीएससीला देखील वर्णनात्मक पॅटर्न यावर्षी पासूनच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार अभ्यासक्रम बदलण्याची तयारी एमपीएससीने सुरू केली हाेती. मात्र या निर्णयामुळे काही वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये असंताेष पसरला हाेता. अचानक पॅटर्न आणि अभ्यासक्रम बदलला जात असल्याने त्यांना नव्याने सुरुवात करावी लागणार हाेती. याविराेधात विद्यार्थ्यांचे एक-दीड महिन्यापासून आंदाेलन सुरू हाेते. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तात्काळ लागू करू नये, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. सरकारने दखल घेत नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याला मान्यता दिली. या निर्णयामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. नागपूर परिसरातील उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काहींचा मात्र विराेध
नुकतेच नागपुरातील काही विद्यार्थ्यांनी नव्या पॅटर्नने परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले हाेते. एमपीएससीची तयारी करणाऱ्या एकाने सांगितले,एक ना एक दिवस नवीन पॅटर्नने तयारी सुरू करावीच लागणार आहे. केवळ २०,२५ टक्के अभ्यासक्रम बदलल्याने काही फरक पडत नाही. उलट नवीन पॅटर्न यूपीएससी प्रमाणे असल्याने केंद्रस्तराच्या परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढण्यास मदत हाेईल,असा विश्वासही या उमेदवाराने व्यक्त केला.
सरकारने सकारात्मक निर्णय घेतला ही चांगली गाेष्ट आहे. यामुळे जुन्या पॅटर्नने तयारी करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा २०२३ व २०२४ च्या परीक्षांची संधी मिळणार आहे. तसेच नव्याने तयारी सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने तयारी करण्यास वेळ मिळणार आहे.
- उमेदवार
विद्यार्थी एकतेचा विजय असो
पुण्यातील बळीराम डोळे यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा मिळालेल्या प्रतिसादामुळे हा निर्णय होऊ शकला. सरकारचा निर्णयासाठी 'देर आये दुरुस्त आये', असे म्हणावे लागेल. कित्येक विद्यार्थ्यांना त्रास देऊन हा निर्णय झालेला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आयोगाचा आडमुठेपणा हरला आणि विद्यार्थ्यांना तर्क एकजुटीचा विजय झाला.
- उमेश कोर्राम,
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.