नागपूरची भाजपा नेता सना खान हत्याकांडातील मुख्य आरोपी अमित शाहू आणि अन्य आरोपींची पोलीस सातत्याने चौकशी करत आहेत. मात्र, सनाचा मृतदेह कुठे फेकला हे सांगायला आरोपी तयार नव्हते. तसेच, पोलिसांचीही दिशाभूल करत होते. यामुळे सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आरोपी अमित साहूची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता, याप्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. तब्बल ६ महिन्यांनी सनाचा मोबाईल व लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागला आहे.
सना खान हत्येची घटना उघडकीस आल्यापासून मानकापूर गुन्हे शाखेची २ पथकं जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. तिच्या सतत मृतदेहाचा शोध सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत यश मिळालेले नाही. डीसीपी मधने म्हणाले की, आरोपी अमित शाहूने सनाची हत्या करून तिचा मृतदेह हिरेन नदीत फेकून दिल्याचे सांगितले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी तिच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आता, याप्रकरणात पोलिसांना सना खानचा मोबाईल व लॅपटॉप सापडला आहे. प्रमुख आरोपी अमित साहू याच्या जुन्या घरातून ह्या दोन्ही वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्यातून, नव्याने तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठवला असून याप्रकरणी अमित साहूच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. यापूर्वी न्यायालयाने नार्को टेस्टसाठी नकार दिला होता.
काय आहे प्रकरण
सना खान यांची मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील अमित उर्फ पप्पू साहू नावाच्या एका व्यक्तीसोबत धाब्यामध्ये पार्टनरशीप होती. त्याच भागिदारीतून १ ऑगस्ट रोजी सना खान अमितला भेटण्यासाठी नागपूर येथून जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. येथील मानकापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर, पोलीस तपासातून सना खानचा खून झाल्याची माहिती समोर आली. आरोपी अमित साहूनेच हा खून केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. पोलिसांनी अमितसह त्याच्या ५ साथीदारांना अटक केली आहे. मात्र, अद्यापही सनाचा मृतदेह पोलसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे, त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.