नागपूर : आई-वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या पेंटरची जयताळा भागात २२ वर्षीय तरुणाने हत्या केली. आईवडिलांना शिवीगाळ केल्याने आरोपीची तळपायाची आग मस्तकात गेली व त्यातून त्याने हे कृत्य केले. या प्रकारामुळे जयताळ्यात खळबळ उडाली. राहुल गुलाबराव खोरगडे (२७) असे मृतकाचे नाव असून, सतीश शेषलाल उसबर्गे (२२) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल पेंटिंगचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. त्याच्या पश्चात पत्नी व भाऊ असा परिवार आहे. राहुलच्या व्यसनामुळे दोघेही वेगळे राहतात.
आरोपी सतीश हा राहुलच्या शेजारी होता. सतीश हा मजुरीची कामे करतो. काही दिवसांपूर्वी राहुल स्वत:च्या आईला मारहाण करीत होता त्यावेळी सतीशने मध्यस्थी केली होती. त्यामुळे राहुल सतीशवर संतापला होता. दारूच्या नशेत त्याने सतीशच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून दोन-तीन वेळा भांडण केले होते. आई-वडिलांना शिवीगाळ करण्यावरून सतीशचा राहुलसोबत पाच-सहा दिवसांपूर्वी वादही झाला होता. या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती व पोलिसांनी राहुलविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. बुधवारी सायंकाळी सहा वाजता सतीश कामावरून घरी परतला. राहुलने परत शिवीगाळ केल्याची माहिती त्याच्या आईने दिली. त्यामुळे तो संतापला. दारू पिल्यानंतर सतीशने घरी जेवण केले. यानंतर लोकांची वर्दळ कमी होण्याची तो प्रतीक्षा करत होता.
बुधवारी रात्री ११ वाजता सतीश कुऱ्हाड घेऊन राहुलच्या झोपडीत पोहोचला. झोपडीचे छत कमी उंचीवर असल्याने सतीशला उभेही राहता येत नव्हते. दरम्यान, सतीशची हाक ऐकून राहुलची झोप मोडली. काही समजण्यापूर्वीच सतीशने कुऱ्हाडीने वार केले. राहुलकडे ब्रुनो नावाचा कुत्रा होता. तो राहुलसोबतच झोपला होता. या प्रकाराने कुत्राही जागा झाला व भुंकायला लागला. पकडले जाण्याच्या भीतीने सतीशने कुत्र्याच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने वार केले. जखमी झाल्यानंतर कुत्रा शांत झाला.
गुरुवारी सकाळी ११ वाजता राहुलची आई सुनंदाबाई आल्या असता त्यांना राहुल मृतावस्थेत आढळला. सुनंदाबाईंनी शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून पोलीस उपायुक्त लोहित मतानी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश बेसरकर हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. राहुलचा सतीशसोबतचा वाद पोलिसांना माहीत होता. त्यांनी सतीशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सत्य बाहेर आले.
मृतदेहाशेजारीच बसला ब्रुनो
ब्रुनो हा पाळीव कुत्रा राहुलसोबत झोपला होता. राहुलने त्याला साखळीने बांधले होते. तो मोकळा असता तर सतीशशी संघर्ष करू शकला असता. घटनेनंतर तो राहुलच्या मृतदेहाजवळ बसला होता. जखमी ब्रुनोवर उपचार करण्यात आले आहेत. त्याला दुखापत केल्याने सतीशवर प्राणी क्रूरता कायद्यांतर्गतदेखील गुन्हा दाखल होऊ शकतो.