नागपूर (भिवापूर) : पेट्रोलपंप मालक दिलीप सोनटक्के यांच्या हत्येला सहा दिवस उलटले असले, तरी तपासकार्यात फारशी प्रगती नसल्यामुळे अखेरीस 'एलसीबी'ने सोनटक्के हत्याकांडात 'एंन्ट्री' केली. सोमवारला (दि.२२) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आयपीएस अधिकारी अनिल मस्के, एलसीबीचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या सहभागातील पथकाने भिवापूर गाठत, हत्याप्रकरणातील पाळेमुळे खोदून काढण्यास सुरूवात केली. दरम्यान या हत्याकांडाचा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर पोहचला आहे.
अटकेतील आरोपींना मिळालेल्या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलिसानी त्यांच्याकडचे शस्ञ, बॅग, गावठी बनावटीची बंदूक, दुचाकीसह रक्कम आदी जप्त केले. आरोपीच्या मोबाईलचे एसडीआर, सीडीआर काढण्यात आले. गत पाच दिवसात पोलीसांनी तपासाची 'गती' वाढविली असली तरी 'प्रगती' माञ साधलेली नव्हती. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर पोलीसी 'खाक्या' आणि दंडुक्याचा 'प्रसाद' सुध्दा फारसा असर करतांना दिसला नाही? मृतकाची पत्नी, दोन मुली, जावई आदींचे बयान नोंदवित, 'पोलीसी स्टाईल' मध्ये खरपुस समाचारही घेतला. सोमवारला (दि.२२) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास परिविक्षाधिन आयपीएस अधिकारी अनिल मस्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या सहभागातील गुन्हे शाखेच्या चार जणांचे पथक भिवापूर पोलीस स्टेशन मध्ये धडकले. आल्याआल्याच त्यांनी तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या खोलीत 'पोलीसी पाहूणचार' देत, विचारपुस सुरू केली. हत्याकांडाचा गुंता सुटण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे धागेदोरे सुध्दा त्यांच्या हाती लागले. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक यातील एका आरोपीसह वाहणाने निघून गेले. पोलीस स्टेशन मध्ये सुरू असलेली धावपळ, पळापळ लक्षात घेता, पोलीस विभाग जणू मुख्य सुञधाराच्या दारात उभा असल्याचे दृष्य आहे.
ताटातीलचं मांजर?
मृतक दिलीप यांचे विवाहबाह्य संबंध, उमरेड कनेक्शन आणि त्यातून कौटुंबिक कलह, प्रॉपर्टीचे वारस असा हा गुंता असुन यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जात असतांना पोलीस व गुन्हे शाखेचा तपास सुध्दा त्याच वळणावर येऊन पोहचला आहे. या हत्याकांडात ताटातीलच मांजर असल्याचे बोलल्या जात आहे.
पोलीस कोठडीत वाढ
पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आरोपींना सोमवारला (दि.२२) उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान पोलीसांच्या विनंती नुसार न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडी पुन्हा दोन दिवसांची वाढ केली.