नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ धमकी आणि खंडणीचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. सध्या तपास सुरू असून एक पथक बेळगावला रवाना करण्यात आले आहे. एका तरूणीचा मोबाईल नंबर या प्रकरणात समोर आला आहे. ही तरूणी कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
या प्रकरणात नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, बेळगावातील स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत. यात ज्या तरूणीचा नंबर देण्यात आला होता. त्या तरुणीला पोलिसांनी शोधलं असून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं समोर आले. एकाकडून या तरूणीला फोन आला होता. काही कामानिमित्त तुमचा नंबर देत असल्याचं सांगण्यात आले. कुणी फोन केला, कुठून केला हे शोधण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलं.
यातील तरूणी पूर्वीपासून आजारी होती. त्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. ही सर्व माहिती स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला मिळाली आहे. आमचे पोलीस पथक तिथे रवाना झाले आहेत. प्रथम दर्शनी जो तपास सुरू आहे त्यात धमकीचा कॉल हा जेलमधूनच झाल्याचं दिसून येते. बेळगावसह मंगळुरू कनेक्शनही त्यात समोर येत आहे असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात अज्ञाताचा फोन कॉल आला. ‘गुगल पे’वर १० कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशी धमकी त्या संवादात देण्यात आली. जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वी १४ जानेवारी २०२३ रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी त्याने डी गँगचा सदस्य असल्याचे सांगत १०० कोटींची मागणी केली होती.
कोण आहे रझिया?रझिया ही युवती सामान्य कुटुंबातील आहे. ती इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. तिचा बॉयफ्रेंड बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिची आणि जयेशची ओळख झाली. रझियाच्या बॉयफ्रेंडने जयेशच्या मोबाइलवरून तिच्याशी संपर्क साधला. याप्रकारे रझियाचा मोबाइल क्रमांक जयेशकडे आला.