नागपूर : चंद्रपूर तसेच वर्धा जिल्ह्यात २ एप्रिलच्या रात्री आकाशातून जळता मलबा पडण्याच्या घटनेला आता जवळपास दाेन महिने लाेटले आहेत, मात्र अद्यापपर्यंत या मलब्याच्या रहस्यावरून पडदा उठलेला नाही. नागरिकांमध्ये या घटनेबाबत असलेली उत्सुकता कायम आहे. याबाबत भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्राे)ने केलेला चाैकशी अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला असून, सरकार याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
२ एप्रिलच्या रात्री जवळपास ८ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी, खडसिंगी तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आदी परिसरात प्रकाशमान वस्तू आकाशातून पडल्या हाेत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. विशेषत: रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे लाेकांचा संशय वाढला हाेता. सिंदेवाही तालुक्यात एक विशालकाय रिंग तसेच अनेक धातूंचे वेस्टन असलेले काळे बाॅल या मलब्यामध्ये हाेते. आठ दिवसांनंतर इस्राेच्या वैज्ञानिकांनी चंद्रपूर जिल्ह्यात पाेहोचून या मलब्याची पाहणी केली व पुढच्या तपासणीसाठी बंगळुरूच्या प्रयाेगशाळेत हा मलबा घेऊन गेले.
हा मलबा कशाचा आहे, असे अनेक प्रश्न लाेकांच्या मनात आहेत. सॅटेलाईट अंतराळात वाहून नेणाऱ्या राॅकेट बुस्टरचे हे भाग असल्याचे निश्चित असले तरी ते काेणत्या देशाचे आहेत, याबाबत प्रश्न कायम आहेत. युराेप, अमेरिकेत अंतराळ कचरा जमिनीवर पडणे नित्याचे असले तरी भारतात अशा प्रकारची घटना अनेक वर्षांनंतर घडल्याने आश्चर्य आहे. दरम्यान, इस्राेने त्यांचा चाैकशी अहवाल सरकारकडे सादर केला आहे. गाेपनीयतेमुळे याबाबत माहिती देण्यास इस्राेच्या वैज्ञानिकांनी नकार दिला आहे.
गुजरातमध्ये १२ मे राेजी पडले साहित्य
उल्लेखनीय म्हणजे नुकतीच गुजरातमध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे. १२ मे राेजी राज्यातील भालेज, खंबाेलाज व रामपुरा या तीन गावांमध्ये धातूचे बाॅल पडल्याचे आढळून आले. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद आणि इस्राेच्या वैज्ञानिकांकडून याबाबत चाैकशी केली जात असल्याची माहिती आहे. हे अवशेष चीनच्या चँग झेंग ३-बी वाय ८६ या सॅटेलाईट लाॅन्च व्हेईकलचे असल्याचे बाेलले जात आहे.