वसीम कुरैशी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी सकाळी ६.०२ वाजता उड्डाण भरलेल्या विमानाने मुंबई एअरपोर्टवर एका इंजिनाच्या आधारे लॅण्डिंग केली. ही इमर्जन्सी लॅण्डिंग करताना वैमानिकांचे कौशल्य पणाला लागले होते.
इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट ६ई ६४१३ नागपूरहून १०८ प्रवाशांना घेऊन मुंबईला रवाना झाली होती. प्राप्त माहितीनुसार नागपुरातून ‘टेक ऑफ’ केल्यानंतर काही वेळांतच या एअरबस ३२० विमानाच्या पायलट्सला कॉकपिटमध्ये ऑईल लिकेज संबंधित संकेत दिसून आले. दरम्यान, विमानाचे एक इंजिन बंद पडले. याबाबत चालक दलाने मुंबई एटीसीला सूचना दिली आणि विमान केवळ एका इंजिनाच्या आधारावर सकाळी ७.०५ वाजता मुंबईत लॅण्ड झाले.
लॅण्डिंगच्या पूर्वी मुंबई एअरपोर्टवर आपत्कालिन स्थितीमध्ये विमान उतरल्यामुळे, सर्व आवश्यक उपाय करण्यात आले होते. या घटनेची माहिती डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कार्यालयाला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनीही विमानाचे निरीक्षण केले.
.................