योगेश पांडे
नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता जिल्ह्यातून मंत्रिपदी कुणाची वर्णी लागते, याकडे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आल्यामुळे आता जिल्ह्यातील आणखी नेत्यांना मंत्रिपद मिळणार, हा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यातून प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना परत मंत्रिपदाची संधी मिळते की शिंदे गटातील आशिष जयस्वाल यांना पद देण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्तेच्या नवीन समीकरणानुसार भाजप व शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद देण्याबाबत फॉर्म्युला नक्की झाला आहे. भाजपच्या मागील सत्ताकाळात फडणवीसांकडे मुख्यमंत्रिपद व गृहमंत्रिपद होते, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जामंत्रिपदाची जबाबदारी होती. २०१९च्या निवडणुकांमध्ये ऐनवेळी बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले होते व त्यानंतर मागील वर्षी त्यांना विधानपरिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळणार की, त्यांना संघटनेचे काम करण्याचे निर्देश मिळतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्यांचा मंत्रिपदावर मोठा दावा आहे.
सोबतच शिंदे गटातील आशिष जयस्वाल यांचे नावदेखील समोर येत आहे. जयस्वाल यांचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता नागपूर ग्रामीणमधून त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर शहरातून कृष्णा खोपडे यांचे समर्थकदेखील दावा करत आहेत. खोपडे हे सलग तीन वेळा पूर्व नागपूर मतदारसंघातून निवडून आले असून, मागील वेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. यावेळी त्यांना निश्चितपणे संधी मिळेल, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. परंतु, भाजपमधील अंतर्गत राजकारण लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळण्याबाबत भाजपचेच पदाधिकारी साशंक आहेत.
कोण बनणार पालकमंत्री ?
मागील कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने पालकमंत्रिपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर होती. आता फडणवीस उपमुख्यमंत्री असल्याने ते नागपूरचे पालकमंत्रिपद स्वीकारणार की, इतर मंत्र्याकडे हे पद देण्यात येईल, याकडे जिल्हा प्रशासनाचेदेखील लक्ष लागले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपददेखील सांभाळले होते.
तरुणांना संधी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातून तरुण आमदारांना संधी देण्याची मागणीदेखील ‘सोशल’ माध्यमांवर जोर धरू लागली आहे. भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून ही भूमिका मांडण्यात येत आहे. शहराध्यक्ष प्रवीण दटके तसेच हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना मंत्रिमंडळात संधी देऊन तरुण रक्ताला न्याय द्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
मंत्रिमंडळातील संधीबाबत ‘नो कमेंट्स’
नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही, याबाबत कुणीही भाष्य करायला तयार नाही. ज्यांची नावे चर्चेत आहेत, त्यांनीदेखील बोलण्यास नकार दिला आहे. पक्षाचे नेते व मुख्यमंत्री शिंदे जी नावे ठरवतील, त्यावरच शिक्कामोर्तब होणार आहे. पक्षाचा आदेश आम्हाला मान्य असेल, असे मत एका वरिष्ठ आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.