राकेश घानोडे
नागपूर : प्रवाशाने धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहणे गुन्हेगारी कृत्य नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशाचा खाली पडून मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना या आधारावर भरपाई नाकारता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.
भारतामध्ये धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहणे सामान्य कृती आहे. हा निष्काळजीपणा होऊ शकतो; पण, गुन्हेगारी कृत्य होऊ शकत नाही. गुन्हेगारी कृत्याचा निकष पूर्ण होण्यासाठी प्रवाशाच्या मनात वाईट हेतू असणे आवश्यक आहे, असेदेखील न्यायालयाने पुढे नमूद केले व एका मृत रेल्वे कर्मचाऱ्याच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली.
मृताचे नाव रमेश पवार होते. २३ डिसेंबर २०१४ रोजी भुसावळ - मुंबई पॅसेंजरने प्रवास करीत असताना पाचोरा रेल्वेस्थानक परिसरात धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते रेल्वेच्या दारात उभे होते. त्यांच्याकडे रेल्वे पास होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना प्रामाणिक प्रवासी ठरविले, तसेच हा अपघात दुर्दैवी घटनेत मोडत असल्याचे सांगितले.
रेल्वे न्यायाधिकरणने नाकारली होती भरपाई
रमेश यांची पत्नी पुष्पा व इतर वारसदारांनी भरपाई मिळविण्यासाठी सुरुवातीला रेल्वे दावा न्यायाधिकरणकडे अर्ज दाखल केला होता. ४ जून २०१८ रोजी न्यायाधिकरणने तो अर्ज नामंजूर केला. त्यामुळे वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.