नरेश डोंगरे
नागपूर : अभूतपूर्व राजकीय घडामोडी अन् त्यानंतर राज्यात आलेल्या नव्या ‘सरकार राज’मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय तूर्त मागे पडला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या सरकारात तयार करण्यात आलेली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यादीही आता याआधीच्या सरकारप्रमाणेच भूतपूर्व ठरली आहे. गृहमंत्र्यांची वर्णी अन् त्यानंतरच्या नव्या सूचना-निर्देशानंतर ही यादी नव्याने तयार होणार आहे.
शीर्षस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक आणि त्याउपरच्या दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ‘टॉप प्रायोरिटी’ची संभाव्य यादी मे २०२२ मध्ये तयार झाली होती. त्यातील काहींची नंतर बदलीही झाली. मात्र, तात्कालिक कारणामुळे नंतर ३० जूननंतर बदल्या जाहीर करण्याचे ठरविण्यात आले. यात एसपी, डीसीपी, ॲडिशनल सीपी, आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे होती. पुढे आणखी काही वरिष्ठांची नावे या यादीत समाविष्ट करण्यावर विचारविमर्श सुरू होता. त्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती अन् अनेकांचे सेटराईटही झाले होते. मात्र, अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घोंगावले. या वादळात सारेच अंदाज आराखडे उद्ध्वस्त झाले अन् बदली प्रक्रियेसह बहुतांश प्रशासकीय घडामोडी बाजूला सारल्या गेल्या. सरकारही गेले अन् आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नवे सरकार उदयाला आले. अद्याप उर्वरित मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार आणि राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा कणा मानला जाणारा गृहमंत्री कोण होणार ते स्पष्ट झाले नाही. गृहमंत्रीच नसल्याने पोलीस बदल्या वगैरेचा विषयच गाैण असून तो पूर्णपणे मागे पडला आहे. दोन आठवडे तरी किमान त्यावर काही शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
तडजोडी मागे पडणार
राज्यात सरकार कुणाचे असो, काही पोलीस अधिकारी क्रीम पोस्टिंग मिळवून घेण्यासाठी विशिष्ट लॉबींचा आटापिटा असतोच. गेल्या अडीच वर्षांत प्रामुख्याने हा विषय चर्चाच नव्हे तर अनेकांना उघड करणारा ठरला आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये बऱ्यापैकी सेट झालेल्यांनी ३० जूनच्या संभाव्य बदलीच्या यादीत स्थान मिळवले होते. त्यासाठी अनेकांनी तडजोडीही केल्या होत्या. मात्र, आता सरकारच बदल्याने ती यादीही बदलणार आहे. ही चर्चा वजा माहिती कळल्यामुळे आधीच्या बदलीच्या यादीत स्थान मिळवणाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यास ती प्रकर्षाने जाणवते.
‘आधी लगीन कोंढाण्याचे’
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची निवृत्तीची तारीख असल्याने आवश्यक म्हणून त्या जागेवर ३० जूनला विवेक फनसाळकर यांची नियुक्ती झाली. ‘बदली’चा विषय संवेदनशील असल्याने शीर्षस्थ अधिकाऱ्यांच्या पातळीवर तो चांगलाच चर्चेत आहे. मात्र, त्यावर तूर्त निर्णय अपेक्षित नसल्याने आता ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ नंतरच बदलीचे, या भूमिकेत राज्याचे पोलीस दल आल्याची सूचक प्रतिक्रिया अनेक शीर्षस्थ पोलीस अधिकारी या संबंधाने देत आहेत.
----