स्त्री ही जन्मत:च सक्षम असते. तिला बेड्यांमध्ये अडकवू पाहणाऱ्या समाजातील चालीरीती, प्रथा, परंपरांशी ती सतत संघर्ष करीत असते. प्रत्येक स्त्रीचे एक स्वप्न असते. ते साकार करण्यासाठी तिची धडपड सुरू असते. अशाच स्त्रियांच्या स्वप्नांच्या पंखांमध्ये प्रेरणेचे बळ भरण्याचे काम नवव्या ‘लोकमत वुमेन समिट’च्या माध्यमातून झाले. महिलांच्या सर्व क्षेत्रांतील गरुडझेपेचा प्रवास उलगडत महिला सन्मानाचा एक नवा विचार देशभरात पोहोचविला गेला. यातून महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवी ऊर्जाही मिळाली.
स्त्रीचे अस्तित्व, अभिव्यक्ती, ‘ती’च्या नजरेतून जाणून घेण्यासाठी लाेढा गाेल्ड टीएमटी बार प्रस्तुत ‘लाेकमत’तर्फे पिजन आणि निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., नागपूर यांच्या सहकार्याने ‘लोकमत वुमेन समिट’चे नववे पर्व शनिवारी नागपुरात हॉटेल सेंटर पाॅइंट येथे आयोजित करण्यात आले.
अन्याय, अत्याचारग्रस्त, शोषणाच्या बळी ते स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा प्रवास ‘उडने की आशा’ या संकल्पनेतून उलगडण्यात आला. ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा होते. याप्रसंगी लोकमत सखी सन्मान राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.