नागपूर : देशात व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना आलेले यश २०२२ च्या व्याघ्रगणनेत पुन्हा एकदा अधाेरेखित हाेत आहे. २०१८ मध्ये ते २९६७ हाेते. कॅमेरा ट्रॅपमध्ये २०२२ च्या गणनेत ही संख्या ३०८० माेजण्यात आली; पण ही संख्या ३१६७ पर्यंत असण्याचा अंदाज आहे. या अहवालात राज्यनिहाय आकडेवारी दिली नसली तरी महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि यात विदर्भाचा वाटा माेठा आहे.
२०१८ च्या गणनेत राज्यात वाघांची संख्या ३१२ वर हाेती आणि इतर राज्याच्या तुलनेत मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंडनंतर महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर हाेता. नव्या अहवालानुसार चार वर्षांत मध्य भारतातील वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढल्याचा दावा केला जात आहे. त्यानुसार राज्यात ३७५ वाघ असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र केंद्रीय आकडेवारीशी विदर्भातील व्याघ्र अभ्यासक सहमत नाही. अहवालातील माहिती अपूर्ण आहे, मात्र हे आकडे केवळ वनक्षेत्रातील कॅमेरा ट्रॅपच्या आधारावरचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्यक्ष केवळ विदर्भातच ४०० हून अधिक वाघ असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातच ३०० हून अधिक वाघ
पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी सांगितले, २०२० मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची गणना करण्यात आली. यामध्ये २५० च्या जवळपास वाघ असल्याचे आढळून आले हाेते. हा केवळ वनक्षेत्रातील आकडा आहे. वनक्षेत्राबाहेर व जिल्ह्यात ३००हून अधिक वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या वाघांची गणनाच हाेत नाही. ताडाेबातील वाघ गडचिराेली जिल्ह्यातही स्थलांतरित झाल्याचा अंदाज आहे.
उर्वरित क्षेत्रात सव्वाशे ते दीडशे वाघ
पेंच व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पेंच प्रकल्पात ४८ ते ५२ वाघ असण्याची शक्यता आहे. याशिवाय मेळघाटात ४७ ते ५० वाघ, नवेगाव-नागझिऱ्यात १० ते १२ वाघ, उमरेड-कऱ्हांडलात १० ते १२ वाघ, बाेर प्रकल्पात १० ते १५ वाघ, गडचिराेलीत १८ ते २० वाघ आणि सह्याद्री क्षेत्रात ५ ते ८ वाघ असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कॅमेरा ट्रॅपद्वारे वनक्षेत्रातील वाघांची गणना केली जाते; पण बाहेर पडणाऱ्या वाघांची गणना हाेत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात गणनेपेक्षा अधिक वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या केंद्रीय प्राधिकरणाचा अधिकृत आकडा आल्याशिवाय अचूक संख्या सांगता येणार नाही.
- बंडू धाेत्रे, वन अभ्यासक