नागपूर : एकिकडे हवामान विभाग विदर्भात जोरदार अंदाज व्यक्त करते, पण दुसरीकडे लहरी पाऊस हा अंदाज चुकवत आहे. आता वेधशाळेने बुधवारपासून पुढचे पाच दिवस पुन्हा विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी मात्र लोकांना पावसाच्या गारव्याऐवजी उन्हाचा ताप व उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर समुद्रसपाटीला हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजे द्रोणीय आकारातील तटीय (ऑफ-शोर-ट्रफ) आसा चे अस्तित्व आणि दक्षिण गुजराथ क्षेत्रात समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती, या गाेष्टी महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.
या प्रभावातून पाच दिवस म्हणजे ९ ते १३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार, तर मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. पावसाचा हा अंदाज व्यक्त केला जात असला तरी विदर्भा मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षाच लागली आहे. मंगळवारीही चंद्रपूर वगळता कुठेही चांगला पाऊस पडला नाही. उलट नागपूरसह इतर भागात नागरिकांना उन्हाची काहीली सहन करावी लागली.