सुमेध वाघमारे
नागपूर : राज्यातील एकमेव नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले ‘एन्डोक्रिनोलॉजी’ विभाग तज्ज्ञाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
येथील दोन्ही ‘एन्डोक्रिनोलॉजिस्ट’ने मेडिकलच्या नाकर्तेपणामुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. यातच ८ महिन्यापूर्वी ४५ लाखांचे विकत घेतलेले यंत्रही आवश्यक साहित्याअभावी बंद पडले आहे. धक्कादायक म्हणजे, याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग, किंवा लोकप्रतिनिधी यापैकी कुणीही जाब विचारलेला नाही.
भारतात २०३० पर्यंत मधुमेही रुग्णांची संख्या १० कोटीपर्यंत पोहोचणार असून जगात आपला देश मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जवळपास १२ वर्षांपूर्वी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मोठ्या प्रयत्नाने ‘एन्डोक्रिनोलॉजी’ विभाग सुरू केला. अत्यल्प मानधन असले तरी गरीब रुग्णांची सेवा घडणार या हेतूने एका ज्येष्ठ ‘एन्डोक्रिनोलॉजी’ तज्ज्ञाने यासाठी पुढाकार घेतला.
पाच वर्षांपूर्वी एका जनहित याचिकेवर न्यायालयाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘एन्डोक्रिनोलॉजी’ विभागात ‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले. यामुळे सहायक प्राध्यापक म्हणून पुन्हा एका युवा ‘एन्डोक्रिनोलॉजी’ तज्ज्ञाने सेवा देण्यास सुरुवात केली. या दोन्ही डॉक्टरांनी ‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नही सुरू केले. परंतु मागील वर्षभरापासून त्यांना मेडिकल प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक मिळत गेली. यामुळे कंटाळून युवा तज्ज्ञाने ऑक्टोबर २०२१ मध्ये तर ज्येष्ठ तज्ज्ञाने डिसेंबर २०२१ मध्ये राजीनामा दिला. सध्या एका मेडिसीन डॉक्टरकडून हा विभाग कसातरी चालविण्याचा प्रयत्न होत आहे.
राज्यातील पहिली एन्डोक्रिनोलॉजी लॅबही बंद
‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मे २०२१ रोजी जवळपास ४५ लाखांचे दोन अद्ययावत यंत्र खरेदी करण्यात आले. यातील ‘एलआयएआयएसओएन केमिल्युमिन्सेस एनालायझर’यंत्राच्या मदतीने ‘एचबीए १ सीडी १०’ नावाच्या चाचणीमुळे मागील तीन महिन्यात मधुमेहाच्या रुग्णामधील शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीची माहिती करता येणे शक्य झाले होते. राज्यातील ही पहिली ‘एन्डोक्रिनोलॉजी लॅब’ होती. परंतु विद्यमान अधिष्ठातांनी आवश्यक ‘किट’ व ‘रिएंजट’च उपलब्ध करून दिले नाही. परिणामी, मागील महिन्यापासून हे दोन्ही यंत्रही बंद पडले आहे.
‘ओपीडीत’ २०० वर गंभीर रुग्णांवर उपचार
‘एन्डोक्रिनोलॉजी’ विभागाचा बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) विदर्भासह आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा व मध्य प्रदेश येथील डॉक्टरांनी पाठविलेले गंभीर रुग्ण यायचे. ओपीडीत जवळपास २०० वर रुग्ण असायचे. त्यांच्यावर ‘एन्डोक्रिनोलॉजी’ तज्ज्ञाकडून उपचार होत असल्याने चांगले निकाल दिसून येत होते. परंतु आता या विभागात तज्ज्ञच नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.