'गली गली में शोर है, खोके सरकार चोर है'च्या घोषणा; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:59 AM2022-12-26T10:59:07+5:302022-12-26T11:03:20+5:30
Winter Session Maharashtra 2022 : संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, ईडी सरकार हायहाय या मागण्यांनी विरोधकांनी सभागृह परिसर दणाणून सोडला.
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी ही विरोधकांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. ईडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या.. राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या, विदर्भातील संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे या मागण्यांसह ईडी सरकार हायहाय च्या घोषणांनी विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला.
बोम्मई सरकार हायहाय, कर्नाटक सरकारचा निषेध असो, राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ, खोके द्या भूखंड घ्या अशा घोषणा देऊन अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुनील राऊत, भास्कर जाधव, विकास ठाकरे, हसन मुश्रीफ आदि सहभागी होते.