निशांत वानखेडे, नागपूर: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने नुकताच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवेतील पदांसाठी घेतलेल्या २०२३ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. एकाहून अधिक संवर्गातील पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ‘ऑप्टिंग आउट’च्या पर्यायाचा लाभ घेत हाेणारा गैरप्रकार टाळण्यासाठी गुणवत्ता यादीपूर्वी पसंतीक्रमाचा पर्याय यावेळी उपलब्ध करण्याचे जाहीर केले हाेते. मात्र आयाेगाने पसंतीक्रमाची प्रक्रिया बाजूला ठेवून गुणवत्ता यादी जाहीर केल्याने यादीतील खालच्या क्रमाच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एमपीएससीने अराजपत्रित गट ब सेवेतील पाेलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, मंत्रालयीन सहायक आणि दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या संवर्गाच्या ७४६ पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये पूर्वपरीक्षा घेतली हाेती. ५ नाेव्हेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आली. ऑप्टिंग आउट’चा लाभ घेत हाेणारे गैरप्रकार टाळण्यासाठी यावेळपासून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करून त्या आधारे पसंतीक्रम भरण्यासाठी उमेदवारांना ७ दिवसांचा कालावधी देण्यात येणार हाेता. पसंतीक्रमाच्या आधारे तात्पुरती निवड यादी लावून एकापेक्षा अधिक संवर्गातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ‘ऑप्टिंग आउट’साठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात येईल, असे नमूद हाेते.
या नियमानुसार मुख्य परीक्षेची साधारण गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यानंतर ऑप्टिंग आउटचा पर्याय उपलब्ध करणे अपेक्षित हाेते. मात्र आयाेगाने नुकतीच ७ मार्च राेजी दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदाची गुणवत्ता यादी व शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने एकापेक्षा अधिक संवर्गात उत्तीर्ण झालेल्यांसाठी ऑप्टिंग आउटचा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराच्या खालच्या क्रमातील उमेदवारांचे नुकसान हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साैदेबाजी हाेण्याची शक्यता
एकापेक्षा अधिक संवर्गात उत्तीर्ण झालेले उमेदवार ‘ऑप्टिंग आउट’चा लाभ घेत खालच्या क्रमातील उमेदवारांशी साैदेबाजी करीत असल्याचे सांगण्यात येते. यात अनेक एजेंटनी शिरकाव केल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. त्यामुळेच यावेळी गुणवत्ता यादीपूर्वी पसंतीक्रमाचा पर्याय उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात येते.