निशांत वानखेडे, नागपूर: नवे वर्ष सुरू व्हायला आता काही तास शिल्लक आहेत. नववर्षाचा जल्लाेष साजरा करताना गारठ्याचा त्रास जानवणार नाही. जानेवारीचा पहिल्या आठवड्यात मराठवाडा वगळता विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे.
नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसह राज्यातील २२ जिल्ह्यात १ ते ७ जानेवारीदरम्यान काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊसही हाेण्याचा अंदाज आहे. सध्या नागपूर, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीच्या किंचित खाली तर किमान तापमान सरासरीच्या वर आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात दिवस व रात्रीचाही पारा सरासरी तापमानाच्या वर आहे. नागपूरला २८.४ अंश कमाल तापमानाची तर १४.८ अंश किमान तापमानाची नाेंद शनिवारी झाली. रात्रीचा पारा सरासरीच्या २.७ अंशाने अधिक आहे. अकाेल्यात सर्वाधिक १६.३ अंश किमान तापमान आहे व उर्वरित जिल्ह्यात ते १४ ते १५ अंशाच्या स्तरावर आहे. दिवसाचा पारा अकाेल्यात सर्वाधिक ३१.७ अंश, ब्रम्हपुरीत ३१.३ अंश तर यवतमाळला ३० अंश आहे.
दिवस-रात्रीचा पारा अधिक असल्याने सध्या थंडीचा जाेर कमी झाला आहे. दिवसा हलका गारवा आणि रात्री हलका गारठा जाणवताे. पुढचा आठवडाभर किमान तापमाप १५ ते १६ अंश तर कमाल पारा ३० अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते या काळात दरवर्षी अशीच परिस्थित असते व खुप जास्त चढ-उतार जाणविणार नाही. उत्तर भारतात धुक्याचा कहर अद्याप कायम असला तरी महाराष्ट्रावर त्याचा विशेष प्रभाव जाणवत नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही चांगली परिस्थिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.