नागपूर : उलटलेली मध्यरात्र पहाटेकडे सरकत होती. तर, वेगाशी स्पर्धा करणारी ट्रेन नागपूरकडे धावत होती. गाढ झोपेत असलेली ती दचकली अन् कुणीतरी बांधून जबरदस्तीने कुठे नेण्याचा प्रयत्न करण्याचा भास झाल्याने तिच्या किंकाळ्या सुरू झाल्या. त्या ऐकून साखर झोपेत असलेले सहप्रवासी जागे झाले. कॉल मिळताच आरपीएफचे सशस्त्र जवानही धावत आले अन् पुढे जे काही घडले ते तिच्या ठाण्यातील (मुंबई)च्या नातेवाईकांचीही झोप उडविणारे ठरले. घटना आहे, सेवाग्राम एक्सप्रेसमधील!
शहापूर, ठाणे येथील शेफाली (वय२२, नाव काल्पनिक) नागपूरला येण्यासाठी तिच्याच वयाच्या नातेवाईक असलेल्या सोनाली (नाव काल्पनिक) सोबत निघाली. कल्याण स्थानकाहून सोमवारी या दोघी सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये बसल्या. त्यांना भंडारा येथे जायचे होते. रात्री त्यांनी घरून आणलेला डबा खाल्ला अन् गप्पा करत करत झोपी गेल्या. रेल्वेगाडी वायुवेगाने नागपूर जवळ करू पाहत होती. कुणीतरी हातपाय बांधले अन् ते जबरदस्ती करीत असल्याचा शेफालीला मंगळवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास भास झाला. त्यामुळे तिने किंचाळणे सुरू केले. तिच्यासोबतची सोनालीच नव्हे तर त्या डब्यातील बहुतांश प्रवासी साखर झोपेतून जागे झाले. त्यांच्या मदतीने सोनालीने शेफालीला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, ती जुमानत नव्हती. ती काय करून घेईल, अशी भीती निर्माण झाल्याने रेल्वे मदत केंद्रात संपर्क करण्यात आला. काही वेळेतच आरपीएफचे सशस्त्र जवान डब्यात दाखल झाले. शेफाली त्यांनाही ऐकत नव्हती. त्यामुळे तिच्याभोवतीच सर्व जण थांबले अन् अखेर सकाळी सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर स्थानकावर थांबताच शेफालीला रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथेही तिचा गोंधळ सुरूच होता. ठाणेदार मनिषा काशिद यांनी तिला जवळ घेतले. काय नेमके झाले, त्याबाबत तिला विचारपूस केली. तिचे वर्तन मनोरुग्णासारखे होते. मला बांधून आणले, माझ्यावर 'जबरदस्ती' केली गेली, असे ती ओरडून ओरडून सांगत होती. सोनालीसह अन्य प्रवासी मात्र असे काहीच झाले नसल्याचे सांगत होते. रेल्वे पोलिसांनी शेफालीच्या पालकांना फोन करून तिच्या वर्तनाची कल्पना दिली. तिचा मोठा भाऊ लगेच विमानाने नागपुरात दाखल झाला. त्याने शेफालीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना जे समजायचे ते समजले अन् तिला तिच्या ठाणे येथील घरी पाठविण्याची तयारी सुरू झाली. लगेच विमानाच्या दोघांच्या तिकिटा काढण्यात आल्या अन् त्यांना सायंकाळी मुंबईला पाठविण्यात आले.तिचे 'गणित' चुकले, त्यांची जमापूंजी गेली
शेफाली तशी हुशार, दहावीत तिला ९४ टक्के मार्कस् मिळाले होते. मात्र, तिची महात्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे सध्या ती खासगी अकाउंटंट म्हणून काम करते. वडिल टेलर तर आई गृहिणी. मोठा भाऊ खासगी काम करतो. घरची स्थिती जेमतेम. मात्र, आईवडिलांजवळ जेवढे होते, ते सर्वच्या सर्व ३० ते ४० हजार रुपये घेऊन तो नागपुरात आला. शेफालीला मुंबई (ठाणे) परत नेण्यासाठी त्याने तातडीने विमानाचे तिकिट काढून देण्याची विनंती पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांना केली. काशिद यांनी त्याला रेल्वेचे तिकिट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रवासात काहीही होण्याचा धोका असल्याचे सांगून हिला आपण एकटे रेल्वेने नेण्याची रिस्क घेऊ शकत नाही, असे तो म्हणाला. त्याचसाठी घरात असलेली सर्व जमापूंजी आपण येथे घेऊन आल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.----