सुमेध वाघमारे नागपूर : ९ महिन्याचा चिमुकल्याचा फुफ्फुसातील शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या बाजूकडे न जाता उजव्या बाजूकडे जात होते. हृदय आणि फुफ्फुसातून शुद्ध व अशुद्ध रक्त वाहण्याचा हा मार्गच बदलल्याने चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या आजाराचे निदानही उशीरा झाल्याने गुंतागुंत वाढली होती. परंतु नागपूरच्या डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्याच्या बळावर व इतर डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी ‘ओपन हार्ट सर्जरी’ करून बाळाला नवे जीवन दिले.
ग्रामीण भागातील या बाळाला जन्मताच हा आजार होता. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘कन्जेनायटल सायनोटिक हार्ट डिसीज’ म्हणतात. अनुभवी ‘पेडियाट्रिक हार्ट सर्जन’ डॉ. संदीप खानझोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या आजाराचे निदान सहाव्या महिन्यात झाले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हे बाळ उपचारासाठी आले तेव्हा बाळाची प्रकृती खालवली होती. उशीरा निदानामुळे गुंतागुंतही वाढली होती. यामुळे शक्य तितक्या लवकर ‘ओपन हार्ट सर्जरी’ करण्याचा सल्ला दिला.
हृदयाचे छिद्रही केले बंद हृदय आणि फुफ्फुसातून रक्त वाहण्याचा मार्गच बदलणे ही जन्मजात रक्त वाहिन्यांची संरचनात्मक विकृती आहे. जी गर्भाच्या विकासादरम्यान होते. जन्मजात विकृती असलेल्या मुलांमध्ये हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरते. पालकांनी तातडीने ओपन हार्ट सर्जरीला परवानगी दिल्यानंतर डॉ. संदीप खानझोडे व हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेदरम्यान हृदयात असलेले छिद्रही बुजविण्यात आले.
-या आजाराचे प्रमाण १० टक्केडॉ. संचेती म्हणाले, लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या एकूण हृदयरोगामध्ये ‘कन्जेनायटल सायनोटिक हार्ट डिसीज’चे प्रमाण साधारण १० टक्के आहे. या आजाराचे निदान पहिल्या महिन्यात होते. परंतु दोन ते तीन टक्केबाळांमध्ये याचे निदान उशीरा होऊ शकते. या बाळाला तीन महिन्यानंतर हृदयाच्या समस्या उद्भवल्या, असेही ते म्हणाले. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत बोबडे, बालरोग क्रिटिकल इंटेन्सिव्हिस्ट टीमचे नेतृत्व करणारे डॉ. आनंद भुतडा, डॉ. रोहित असरानी, डॉ. कल्याणी कडू व डॉ. नीरव पटेल यांनी महत्त्वाचे योगदान दिले.