नागपूर : ‘जो पेन्शन बहाल करेगा, वही देश पे राज करेगा’, ‘कर्मचाऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर, सरकार येणार का थाऱ्यावर, ‘एकच मिशन...जुनी पेन्शन’ , अशा घोषणा देत पेन्शन जनक्रांती महामोर्चाने मंगळवारी विधिमंडळाला धडक दिली. मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाल्याने यशवंत स्टेडियम ते मॉरिस कॉलेज टी पाॅईंट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पेन्शनवर आता निर्णय घेण्याच्या मागणीसाठी अडून बसले. रात्री उशिरापर्यंत मोर्चेकरी रस्त्यावर ठाण मांडून होते.
मंगळवारी पेन्शन जनक्रांती महामोर्चातील कार्यकर्त्यांनी धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर एकच गर्दी केली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वितेश खांडेकर, आशुतोष चौधरी, मनीषा मडावी, गोविंद उगले, मिलिंद सोलंखी, सुनील दुधे, आदींच्या नेतृत्वात मोर्चा विधिमंडळाकडे निघाला. मोर्चात मोठ्या संख्येत कार्यकर्ते सहभागी झाल्याने पोलिसांचे नियोजन विस्कटले. वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी मॉरिस कॉलेज टी पाॅईंटवर मोर्चा अडवला, तेव्हा त्याचे दुसरे टोक व्हेरायटी टॉकीज चौकात होते.
निवडणुकीपूर्वी पेन्शन संदर्भात निर्णय घेणार
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेत नियम १०१ अन्वये, जुन्या पेन्शनसंदर्भात विशेष उल्लेखाद्वारे कपील पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावर पवार म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारस्तरावर सुद्धा वेगळा विचार सुरू आहे. केंद्राचा निर्णय झाल्यावर त्याच धर्तीवर राज्यात सुद्धा निर्णय घेण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. सरकार सकारात्मक असल्याची माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
आम्ही देऊ पेन्शन : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाला भेट दिली. त्यांनी आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही जुनी पेन्शन देऊ, असे आश्वासन दिले.