लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. नागपूर विभागाचा निकाल ९४.७३ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत निकालात दोन टक्क्याने वाढ झाली असली तरी राज्यात नागपूर विभाग नवव्या क्रमांकावर आहे. नागपूर विभागाचा विचार केला तर दहावीमध्ये विभागात ९६.११ टक्के घेत गोंदीया जिल्हा अव्वल तर ९२.२ टक्क्यांसह वर्धेचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर जिल्हा ९५.१७ टक्के घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागीय मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेकरिता नागपूर विभागातून १ लाख ५१ हजार ०२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ४९ हजार ८१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी १ लाख ४२ हजार ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३८,५३० विद्यार्थी ७५ टक्के गुण मिळवित प्रावीण्यासह प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले.
५४,८४२ विद्यार्थी ६० टक्के गुण मिळवित प्रथम श्रेणीत, ३८,४०२ विद्यार्थी ४० टक्के गुण मिळवित द्वितीय श्रेणीत, १०,२३१ विद्यार्थी ३५ टक्के गुण मिळवित तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विभागात एकूण १ लाख ४२ हजार ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९४.७३ टक्के इतकी आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
असा आहे नागपूर विभागाचा निकालगोंदीया - ९६.११ टक्केभंडारा - ९५.४१ टक्केनागपूर - ९५.१७ टक्के
गडचिरोली - ९४.६७ टक्केचंद्रपूर - ९४.०५ टक्केवर्धा - ९२.२ टक्केएकूण - ९४.७३ टक्के
२२ काॅपी प्रकरणेनागपूर विभागात एकूण २२ काॅपी प्रकरणे आढळली. त्यापैकी ८ प्रकरणात विद्यार्थी दोषी आढळले. तर १४ प्रकरणांत निर्दोष दिसले.
मुलीच आघाडीवरनागपूर विभागात यंदाही मुलीच अव्वल आहेत. विभागात एकूण ७६,६९२ मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी ७१,१७८ (९२.८१ टक्के) मुलं उत्तीर्ण झाले. तर ७३,२०५ मुलींपैकी ७०,८२७ (९६.७५ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या.