नागपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज विविध विमान कंपन्यांचे आणि एअरफोर्सचे विमान व हेलिकॉप्टर ये-जा करतात. हा प्रकार १४ तास सुरू असतो. परंतु रात्रीच्या वेळी अंधारात विमानतळावर उतरणे पायलटच्या दृष्टीने खूप सावधानी बाळगण्याचे काम असते. त्यासाठी रात्रीच्या वेळी विमानाच्या पायलटला एटीसी टॉवरकडून लाइटच्या रूपाने सिग्नल देऊन दिशा आणि लॅण्डिंगस्थळ दाखविण्यात येते. या पूर्ण प्रक्रियेला इन्स्टुमेंट लॅण्डिंग (आयएलएस) म्हणण्यात येते.
विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमात लावण्यात येणारे बीम लाइट समस्येचे कारण बनतात. या कार्यक्रमासाठी लेझर बीम लाइट आकाशात फिरविण्यात येतात. यामुळे विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटला असुविधा होते. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी २१ मार्चपासून आजूबाजूच्या परिसरातून विमानतळाच्या १५ किलोमीटर वायुक्षेत्रात सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत आकाशात बीम लाइट न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीत घातली बंदी
एका वरिष्ठ पायलटनुसार देशातील काही विमानतळ आता शहराच्या मध्यभागी आले आहेत. दिल्लीच्या गुडगाव आणि महिपाल विमानतळावर लेझर संबंधित समस्या निर्माण झाल्यामुळे विमानतळाच्या आजूबाजूला लेझर बीम लाइट आकाशात फिरविण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागपूर विमानतळावर बहुतांश विमान मनीषनगर आणि चिंचभवन फ्लायओव्हरकडून लॅण्डिंग करतात. या परिसरातील कार्यक्रमातील बीम लाइटच्या प्रकाशामुळे विमान उतरताना अडथळे येत आहेत.
परिस्थितीनुसार जारी राहणार बंदी
सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या मते विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात तेज बीम लाइट आकाशात फिरविल्यामुळे विमानाचा अपघात होऊ शकतो. त्यासाठी २१ मार्चपासून पुढील दोन महिन्यापर्यंत आकाशात बीम लाइट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणार असून, परिस्थितीनुसार बंदीची तारीख वाढविण्यात येईल.
.........