नागपूर : येथील मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनेचा आराखडा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला. नागपूर विभागातील रेल्वेच्या योजना, सुरू असलेली आणि प्रस्तावित कामांच्या संबंधाने फडणवीस यांनी मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. यावेळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडे ईमारत प्रस्तावित असून एफओबी तसेच रुफ प्लाझा, लिफ्ट आणि एस्केलेटरसह आगमन आणि प्रस्थान शिवाय दोन्हीकडे सरफेस तसेच बेसमेंट पार्किंग आणि वाहतूकीसंबंधातील आराखडा पांडे यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवला.अमृत भारत योजनेत ज्या १५ रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आला, त्या स्थानकांच्या कामांवरही यावेळी चर्चा झाली. त्याचप्रमाणे गोंधनी रेल्वेस्थानकाचा विकास सॅटेलाईट स्टेशनच्या रुपात केला जाणार असून त्यात नवीन ईमारत, १२ मिटर रुंद फुट ओव्हर ब्रीज, एप्रोच रोड आणि ईतर साैंदर्यीकरणाचा समावेश असल्याचे सांगून त्या कामासंबंधीची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली.वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचा आढावाराज्यातील अनेक मागास भागाला जोडणाऱ्या वर्धा - नांदेड रेल्वे मार्गाचा आढावाही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेतला. चालू आर्थिक वर्षांत वर्धा - नांदेड रेल्वे मार्गावरचे काही ब्लॉक सेक्शन खोलण्याची योजना असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, विकास कामे युद्धस्तरावर करा, राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे यावेळी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.