नागपूर : विमानाच्या उड्डाणांवर आता धुक्याचा परिणाम दिसू लागला आहे. बुधवारी दुपारी एअर इंडियाचे मुंबई-रायपूर विमान धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्यामुळे नागपूरला वळविण्यात आले. रायपूर येथील धुके तीन तास दूर होण्याची वाट पाहिल्यानंतर अखेर विमानातील प्रवाशांना बसने रायपूरला पाठविण्यात आले.
बुधवारी सकाळी १०:३० च्या सुमारास एअर इंडियाचे एआय-६५१ विमान मुंबई-रायपूरने आकाशात उड्डाण घेतले. जवळपास १२ वाजता रायपूरच्या आकाशात आले. उतरण्याची परवानगी नाकारल्याने एअर बस-३२१ सारखे जंबो जेट १४० प्रवाशांना घेऊन काही वेळ आकाशात घिरट्या मारू लागले. त्यानंतर जवळच्या नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डायव्हर्ट करण्यात आले. हे विमान नागपूर विमानतळावर दुपारी १२:३० वाजता उतरले. जवळपास ३ तास प्रवाशांना विमानात बसवून ठेवण्यात आले. त्यांना चहा-नाश्ता देण्यात आला. उशीर झाल्यानंतर दुपारी ३:३० वाजता त्यांना तीन स्लीपर क्लास कोचमधून रायपूरला पाठविण्यात आले.
नागपूर विमानतळावर ११६ प्रवासी उतरले. त्यापैकी ८० प्रवाशांना वगळता अन्य खासगी टॅक्सीने रायपूरला रवाना झाले. त्यानंतर विमान सायंकाळी उशिरा रायपूरऐवजी विशाखापट्टनमकडे रवाना झाले. एआयचे हे विमान दिल्ली ते मुंबई, मुंबई ते रायपूर आणि रायपूर ते विशाखापट्टनमदरम्यान उड्डाण घेते.
इंडिगोचे विमान भुवनेश्वरला ‘डायव्हर्ट’
रायपूरमध्ये धुके जास्त प्रमाणात असल्यामुळे इंडिगोचे दिल्ली-रायपूर विमान त्याचवेळी भुवनेश्वरला डायव्हर्ट करण्यात आले. नागपूर विमानतळावर याच वेळेत एअर इंडियाचे लॅण्डिंग झाल्यामुळे इंडिगोच्या विमानाला भुवनेश्वर विमानतळावर उतरविण्यात आले.