नागपूर : मार्च महिन्यात नागपुरात झालेल्या ‘जी-२०’ समिटच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ‘मिशन भिकारीबंदी’ राबविण्यात आले होते. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात अधिसूचनादेखील जारी केली होती. मात्र, सव्वा महिन्यातच आयुक्तांचा संकल्प हवेत विरल्याचे चित्र असून, शहरातील काही चौकांमध्ये भिकारी परतल्याचे दिसून येत आहे. वर्दळीच्या चौकांमध्ये भीक मागणेदेखील सुरू झाले असून, ‘जी-२०’पुरताच हा दिखावा होता का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून नागपूर शहरात चौकाचौकांत उभे राहून भीक मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात नागरिकांकडून वारंवार ओरड होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, मार्च महिन्यात ‘जी-२०’च्या तोंडावर युद्धपातळीवर नागपूर पोलिसांनी भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले होते. पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार वाहतूक सिग्नल व रस्त्याच्या कडेला तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भीक मागण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच जे लोक याचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद होते. ९ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत हे निर्देश लागू राहतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मागील काही दिवसांअगोदरच भिकारी काही चौकांमध्ये दिसून येत आहेत. त्याकडे पोलिस प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे.
या भागांमध्ये परतले भिकारी
शहरातील विविध चौकांमध्ये भिकाऱ्यांचा वावर होता. महिनाभर सगळीकडेच शांतता होती. मात्र, आता परत भिकारी परतले आहेत. मुंजे चौक, यशवंत स्टेडियम, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, सीताबर्डी, इतवारी या भागांमध्ये भिकारी दिसून येत आहेत. सीताबर्डी व लगतच्या भागांमध्ये चौकांमध्ये उभे राहून भीक मागणेदेखील सुरू झाले आहे. पोलिसांची तेथे नियमित गस्त असते. मात्र, कुठलीही कारवाई झालेली नाही.
भिकाऱ्यांची सोय व्हावी, उपद्रव टाळावा
अनेक भिकारी हे उन्हाळ्यामुळे शहरात परतले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी परतल्याचे अनेकांनी सांगितले. प्रशासनाकडून त्यांच्या रोजीरोटीची सोय करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक भिकाऱ्यांच्या गटांनी फुटपाथदेखील काबीज केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनादेखील त्रास होतो. बरेचदा काही भिकारी अमली पदार्थांच्या नशेत रस्त्यांवर उपद्रव करतात. जाणूनबुजून असा प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असादेखील नागरिकांचा सूर आहे.