नागपूर : अवैध भूखंड प्रकरणी अटक झालेल्या आरोपीला जामीन व प्रकरण साैम्य करण्यासाठी तपास अधिकाऱ्याने नऊ लाख रुपयांची मागणी केल्याची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यामुळे भिवापूर शहरातील या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
शिवारामा माेहनराव सत्यनारायण उर्मी (रा.नांदुरा,जिल्हा बुलढाणा) व माेहम्मद हनिफ जादा (रा. देसाईगंज वडसा, जिल्हा गडचिराेली) यांच्यातील भूखंड वाद न्यायालयात पाेहाेचला. नंतर पाेलिसांनी माेहम्मद ताेहीद, मिर्झा नदीम शमीम बेग (रा. भिवापूर), इरशाद चांद बेग (रा. भिवापूर) यांच्यासह अन्य एकावर ऑगस्ट, २०२१ मध्ये विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा नाेंदविला.
या आराेपींना ऑगस्ट-२०२१ मध्ये उच्च न्यायालयाने, तर सप्टेंबर-२०२१ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. या काळात त्यांना भिवापूर पाेलिस ठाण्यात राेज हजेरी बंधनकारक होते. जामीन मंजूर हाेण्यासाठी प्रकरण साैम्य करावे म्हणून मिर्झा नदीम व ताेहीद यांनी तपास अधिकारी शरद भस्मे यांच्याशी चर्चेच्या सप्टेेंबर ते डिसेंबर-२०२१ मध्ये चार वेगवेगळ्या व्हिडीओ क्लिप तयार केल्या. त्यात शरद भस्मे यांनी नऊ लाख रुपयांची लाच मागितल्याचे दिसून येते.
या क्लिपबाबत माहिती मिळताच शरद भस्मे यांनी मिर्झा नदीमला ११ फेबुवारी २०२२ ला अटक केली. त्याची २८ फेब्रुवारी २०२२ ला न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यानंतर,या चारही क्लिप व्हायरल करण्यात आल्या. वादग्रस्त जमीन अकृषक करून तिथे राेड व इतर सुविधा तयार करण्याचे काम ताेहीदने मिर्झा नदीमला दिले हाेते. त्यासाठी मिर्झा नदीमच्या नावे पाॅवर ऑफ अटर्नी केली हाेती. या क्लिप व्हायरल हाेताच, सहायक पाेलिस निरीक्षक शरद भस्मे वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहे.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
या व्यवहारात १ काेटी ९४ लाख २५ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार शिवारामा सत्यनारायण उर्मी यांनी पाेलिसांत दाखल केली. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा लागताे, शिवाय तपास अधिकाऱ्याने पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या दिशानिर्देशानुसार तपास करणे अपेक्षित हाेते. या प्रकरणात फसवणुकीची रक्कम जवळपास दाेन काेटी रुपये असताना, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला नाही.
या प्रकरणाबाबत आपण संपूर्ण माहिती घेतली आहे. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चाैकशीचे आदेश दिले आहे. चाैकशीसाठी अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. संदीप पखाले यांची नियुक्ती केली आहे. चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दाेषींवर याेग्य ती कारवाई केली जाईल.
- विशाल आनंद,पाेलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण